लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाजारात अनेक वेळा दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई केली जाते. असे प्रसंग अनेक वेळा सामान्यांसोबत घडत असतात. मात्र, भारत सरकारच्या कोणत्याच चलनाला कोणीच मनाई करू शकत नाही, असे बँकेतील तज्ज्ञांचे मत असून, तुमच्याकडून कुणी हे नाणे स्वीकारले नाही तर तुम्ही आरबीआयकडे यासाठी तक्रारही करू शकता.
पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर सुटे पैसे म्हणून अनेकदा दहा रुपयांची नाणी दिली जातात. ही नाणी चलनात असतात. मात्र, कधी कधी बाजारात काही व्यावसायिक ती स्वीकारण्यास नकार देतात. अशावेळी सामान्य ग्राहकाला अडचणीचा सामना करावा लागतो.
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
जी नाणी चलनात आहेत त्यांना कोणीच मनाई करू शकत नाही. सद्यस्थितीत २५ पैशांचे नाणे बंद झाल्यामुळे केवळ ते बाजारात दिसत नसेल मात्र, १ रुपया, पाच रुपये, दहा रुपये, या नाण्यांवर कुठलीच बंदी नाही. जे भारत सरकारचे चलन आहे त्यावर बंदी नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणती नाणी नाकारली जातात
५० पैसे, २५ पैसे ही नाणी सध्या बाजारातच नाहीत. त्यामुळे ही नाणी स्वीकारली जात नाहीत. मात्र, जी बाजारात आहेत, त्यांना नाकारता येत नाही. कधी कधी दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास बाजारात काही व्यापारी किंवा अनेक वेळा रिक्षाचालकही अशी नाणी स्वीकारत नाही. मात्र, ते चुकीचे आहे. या नाण्यांवर कुठलीच बंदी नाही.
बँका अडवू शकत नाहीत
बँकेत तुम्ही दहा रुपयांची नाणी दिल्यास बँक कधीच अडवणूक करू शकत नाही. शिवाय, तुम्ही मोठ्या रकमेचा भरणाही जर नाण्यांच्या द्वारे केला तरी बँक हे चलन नाकारू शकत नाही. असे झाल्यास तुम्ही रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकता.
कोट
एका वेळी पेट्रोलपंपावरून दहा रुपयांची नाणी मिळाली. मात्र, एका दुकानात ही नाणीच स्वीकारली जात नव्हती. त्यावेळी दुसरे सुटे पैसे नसल्याने मोठी अडचण झाली होती. दोन ते तीन वेळा असा अनुभव आला आहे.
- अक्षय चौधरी, नागरिक
दहा रुपयांचे नाणे चालत नाही, असे ऐकण्यात आले होते. मात्र, तसा अनुभव आला नाही. एका वेळी एका रिक्षाचालकाने सुरुवातीला नाणे खाली-वर पाहून नकार दिला. मात्र, नंतर त्याने ते स्वीकारले होते.
- शुभम काळे, नागरिक
कोट
दहा रुपयांचे नाणे हे भारत सरकारचे चलन आहे. त्याला स्वीकारण्यास कोणी मनाई करू शकत नाही. बँकांमध्ये हे नाणे स्वीकारण्यास कधीच मनाई केली जाणार नाही. जी नाणी बाजारात आहेत, त्यांनना बाजारात स्वीकारण्यासही मनाई केली जाऊ शकत नाही. असे झाल्यास तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकतात.
- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, अग्रणी बँक मॅनेजर