डिगंबर महाले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : हल्ली बऱ्याच व्यक्तींचे फेसबुक अकाउंट प्रोफाइल बनावटरीत्या (फेक) बनवून फ्रेंड लिस्टमधील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, ‘मी रुग्णालयात उपचार घेत आहे. पैशांची खूप गरज आहे,’ असे व तत्सम कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अधिकारी, राजकीय नेते मंडळी, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक, सामान्य नागरिक या सर्वांनाच लक्ष केले जात आहे. आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे किंवा बनावटरीत्या तयार करून त्याचा दुरुपयोग केला जातो आहे, असे कळल्यावर प्रत्येकाचे धाबे दणाणते. घाबरून ही मंडळी सैरभैर होते. त्यात चुकीचे व अतांत्रिक सल्ले मिळाल्यावर तर त्यांची अवस्था अधिकच बिकट होते. योग्य सल्ला व उपाययोजना न झाल्याने हे लोक अनेक दिवस बेचैनीत घालवतात. पोलिसांत तक्रारी करूनही त्यातून काही समाधानकारक फलश्रुती होईलच असे नाही.
ज्यांचे कोणाचे बनावट फेसबुक प्रोफाइल बनवले जाईल त्यांनी आता न घाबरता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी :
१) प्रथमतः ज्यांचे फेसबुक प्रोफाइल फेक बनवले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेले फेक प्रोफाइल शोधा. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून या फेक प्रोफाइलची फेसबुक लिंक मागवून घ्या.
२) त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाइलवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा.
३) तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
४) Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील.
Me, A Friend आणि Celebrity.
५) आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाइल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा. फेक प्रोफाइल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
इतरांनी ही प्रोफाइल फेक रिपोर्ट करताना आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्टवरील अकाउंटवर जाऊन सेम वरीलप्रमाणेच इंस्ट्रक्शन्स फॉलो करून तिथे फक्त Me ऐवजी A Friend सिलेक्ट करा.
नेक्स्ट केल्यानंतर नाव टाइप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये तुमच्या ज्या मित्राची फेक फेसबुक प्रोफाइल बनवली आहे, त्याचे नाव तिथे टाइप करा. तिथे तुमच्या मित्राची ओरिजनल फेसबुक प्रोफाइल येईल. तिला सिलेक्ट करा. रिपोर्ट सेंड करा, फेक प्रोफाइल काही वेळाने बंद होईल.