ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - शहरातील इदगाह कॉम्प्लेक्स परिसरात गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणा:या लंगूर जातीच्या वानराला पकडण्यात अखेर शनिवारी दुपारी यश आले असून त्याला जंगलात सोडण्यात आले. या भागातील दुकानांच्या काचासमोर बसून हे वानर काचांना मारत होते तर कधी दुकानांसमोर येऊन येणा:या-जाणा:यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. सुदैवाने त्याने कोणावर हल्ला केला नाही की नुकसान झाले नाही. मात्र यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्याला पकडण्यासाठी शनिवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. जे. सोनवणे वनरक्षक डी. ए. जाधव, पी. एस. भारुडे, अतुल रायसिंग तसेच वनमजूर दगडू पाटील, गोपाल वाढे यांच्यासह बयो संस्थेचे सचिव विवेक देसाई हे त्या ठिकाणी पोहचले. मात्र माकड हुलकावनी देऊन पळाले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते पुन्हा आल्याने अखेर पिंजरा लावून त्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय दवाखान्यात तपासणी करून जंगलात सोडण्यात आले.