जळगाव- चंद्र आणि गुरूच्या पिधानयुतीचा अद्भूत आणि प्रेक्षणीय खगोलयीन घटना गुरूवारी जळगावकरांना बघायला मिळणार आहे़ ही पिधानयुती अनेकदा होते, पण आपल्या भागातून दिसण्याचा हा योग पहिल्यांदाच येणार आहे.जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यात पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते. तसेच गुरू आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला की गुरुग्रहण होते. या ग्रहणाला पिधानयुती असे म्हणतात. चंद्र ज्यावेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो, याला पिधानयुती असे म्हणतात.गुरूवारी सायंकाळी ापल्याला चंद्र आणि गुरूची पूर्ण पिधानयुती बघायला मिळेल. सायंकाळी ५ वाजता या पिधानयुतीला म्हणजे गुरूसमोर चंद्र यायला सुरुवात झालेली असेल. सूर्यास्तानंतर ज्यावेळी आपल्याला चंद्र दिसायला लागेल़ त्यावेळी चंद्राने गुरूला पूर्ण झाकलेले असेल. साधारण ६ वाजून १० मिनिटांनी गुरू चंद्राच्य मागून हळूहळू बाहेर यायला लागेल. ६ वाजून २५ मिनिटांनी गुरू त्याच्या चार मुख्य चंद्रांसह बाहेर आलेला असेल आणि हेच ते प्रेक्षणीय दृश्य असेल. २६ तारखेला अमावास्या असल्याने २८ तारखेला चंद्राची कोर असेल आणि योगायोगाने त्यादिवशी गुरूचे चारही मुख्य एकाच बाजूला असल्याने चंद्रकोरच्या खाली गुरूचे चार चंद्र आणि गुरू असे अद्भूत दृश्य दुर्बिणीतून एकाच वेळी बघता येणार आहे़मू़जे़च्या छतावरून खगोल दर्शनाची व्यवस्थापिधानयुतीचा हा अद्भूत नजारा १२ इंचच्या परावर्तीत दुर्बिणीतून सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत मू़जे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मू़जे महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने बघण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे खगोल अभ्यासक अमोघ जोशी व भूगोल विभागाच्या प्रमुख प्रा. प्रज्ञा जंगले यांनी कळविले आहे़