खगोलीय अनुभव : जळगावकरांसाठी लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन
खगोलप्रेमींसाठी पर्वणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चंद्र आणि मंगळाच्या पिधानयुतीचा विलोभनीय चमत्कार जळगावकरांना शनिवारी पाहायला मिळणार आहे. आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती आहे. परंतु पिधानयुती हे पण एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते तसेच मंगळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की मंगळ ग्रहण होते या ग्रहणाला पिधानयुती असे म्हणतात.
इन्फो :
पिधानायुती म्हणजे काय?
चंद्र ज्यावेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. याला पिधानयुती असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, पण क्वचित प्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार बघायला मिळतो. ‘पूर्ण पिधानयुती’ व ‘स्पर्शीय पिधानयुती’ असे पिधानयुतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ जवळजवळ एक तासाचा असतो. स्पर्शीय पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करत असल्याने हा काळ खूप छोटा असतो.
संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी या पिधानयुतीला म्हणजे मंगळाच्या समोर चंद्र यायला सुरुवात होईल. सूर्य आकाशात असल्याने आपण ते बघू शकणार नाही. सूर्यास्तानंतर ज्यावेळी चंद्र आपल्याला दिसायला लागेल त्यावेळी चंद्राने मंगळाला पूर्ण झाकलेले असेल. साधारण ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर यायला लागेल. ७ वाजून २७ मिनिटांनी मंगळ पूर्णपणे बाहेर आलेला असेल आणि हेच ते प्रेक्षणीय दृश्य असेल. १२ तारखेला अमावास्या असल्याने १७ तारखेला चंद्राची कोर आणि मंगळ असे अद्भुत दृश्य दुर्बिणीतून एकाच वेळी बघता येईल.
कोरोनामुळे यंदा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने या खगोलीय घटनेचे लाइव्ह प्रक्षेपण युट्युबवरून केले जाणार असल्याचे खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी कळविले आहे.