लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सात विविध रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला शनिवार १६ पासून सुरुवात झाली आहे. यात पहिल्या दिवशी ७०० पैकी ४४३ जणांनीच लस टोचून घेतली तर २२७ जणांनी जिल्ह्यात या लसीकरणाला दांडी मारली होती. जिल्ह्यात गैरहजर राहिल्याने २७ तर लस देताना दहा टक्के डोज वाया गेल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १९ हजारांच्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी झालेली आहे. मात्र, प्रत्यक्ष लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यासाठी प्रमुख अधिकारी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन लसीकरणही केले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. भीतीपोटी कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. जीएमसीत १, डी. बी. जैन रुग्णालयात ७, जामनेरला ९, चोपड्याला ३, चाळीसगावला २, पारोळा येथे १, भुसावळ येथे ४ डोज वाया गेले आहेत. नियमानुसार एका बाटलीतून दहा जणांना डोस देतो येतो, आणि ती चार तासांतच वापरायची असते.
जिल्ह्याला डोज मिळाले
२४, ३२०
डोज गेले वाय
४० ते ४५
पहिल्या दिवशी दिलेले डोज
४४३
अनुपस्थित
२२७
घाबरू नका
सौम्य प्रमाणात थंडी ताप, अंगदुखी, खांदेदुखी अशी काही प्रमाणात लक्षणे काही लाभार्थ्यांंना जाणवू शकतात, मात्र ही सौम्य लक्षणे असल्याने यांना घाबरू नये, असे लक्षणे जाणवल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून ती लक्षणे सांगावीत, ही लक्षणे प्रत्येकाला येत नाहीत आणि तरी लवकर बरी होतात, असे आवाहन मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
एका बाटलीत दहा डोज
लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोज देता येतात. ही बाटली काढल्यानंतर ती चार तासांत वापरणे आवश्यक असते. तसेच डोज भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण दहा टक्के डोज वाया जाऊ शकतात.