लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उपमहापौर सुनील खडके यांनी महिनाभरापासून राबविलेल्या ‘जनता दरबार’ या उपक्रमाचा गुरुवारी समारोप करण्यात आला. या उपक्रमात ६०० हून अधिक तक्रारी उपमहापौरांकडे मांडण्यात आल्या आहे. त्यापैकी ४११ तक्रारींचा निपटारा केला असल्याचा दावा उपमहापौर सुनील खडके यांनी केला आहे. यामध्ये कचऱ्याची सफाई, गटारीची सफाई, चाऱ्या बुजणे, अतिक्रमण, पेन्शनबाबत तक्रारी होत्या. या उपक्रमातंर्गत सर्वाधिक तक्रारी या शहरातील रस्त्यांबाबत होत्या. मात्र, अमृतनंतरच या रस्त्यांचे काम होणार असल्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले आहे.
२१ जानेवारीपासून उपमहापौरांनी दर गुरुवारी ‘जनता दरबार’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेवून त्या सोडविण्यावर भर देण्यात आला होता. गुरुवारी या उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी थंडबस्त्यात असलेली गुंठेवारी, अमृत जलप्रकल्प, मलनिस्सारण – भुमिगत गटारी या महत्वाकांक्षी योजनांना होत असलेला विलंब, आणि योजनांतून वगळल्या गेलेल्या कॉलन्या परिसर, त्याचबरोबर एलएडी पथदीवे बसविण्याचे कामांतील संथ गती आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या.
२३ तक्रारी या जागीच सोडविण्यात आल्या.
चार दरबारात सुमारे ४११ तक्रारी या मार्गी लागल्या आहेत. बहुतांशी तक्रारी या जनता दरबारात उपस्थित विभाग प्रमुखांकडून जागच्या जागीच मार्गी लावण्यात आल्या. जनता दरबारात मागील व नविन अशा एकूण ५८५ तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यातील एकूण ३९८ तक्रारी मार्गी लागल्यात तर उर्वरित १८७ तक्रारी सोडविण्यासाठी संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे , अशी माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी दिली. दरम्यान, रस्त्यांचा प्रश्नावर अनेक नागरिकांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे देखील गाऱ्हाणी मांडत नाराजी व्यक्त केली.