लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यात ४३ ग्राम पंचायतींच्या निवडणुका पार पडल्यात त्यात ४६३ सदस्य संख्या होती. त्यात २६१ म्हणजे ५० टक्के पेक्षा जास्त महिला सदस्य निवडून आल्या आहे. त्यात तालुक्यातील गाढोदा आणि मण्यारखेडा या गावांमध्ये तर महिला राजच आहे. गाढोदात नऊ सदस्यांपैकी सहा तर मण्यारखेडामध्ये देखील सहा महिला सदस्य आहेत.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा बहुतांश गावांमध्ये आता महिला पुढे यायला सुरूवात झाली आहे. २० वर्षाच्या तरुणीपासून अगदी ज्येष्ठ महिलांनी देखील ग्रामपंचायत निवडणुक लढवली. काही गावांमध्ये तर महिलांसाठी आरक्षण नसलेल्या ठिकाणी देखील महिला निवडून आल्या आहेत.
नशिराबाद येथे ८२ उमेदवार उभे होते. त्यातील ८१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर उरलेल्या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गाढोदा, मण्यारखेडात महिला राज
गाढोदा येेथे शालुबाई पाटील, धृपदा भिल्ल, शोभाबाई पाटील, उषा मोरे, ललिता मराठे, सिमा मराठे या तर मण्यारखेडा येथे आशा पाटील, विजयाबाई पाटील, बुगाबाई पाटील, जयश्री पाटील, अरुणाबाई पाटील, माधुरी पाटील या महिला सदस्य निवडून आल्या आहेत.
आकडेवारी
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती
४३
निवडून आलेले उमेदवार
४६३
ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार
२६१
कोट -
महिलांना ग्रामपंचायत निवडणुकत ५० टक्के आरक्षण मिळाले त्याचा फायदा आम्हाला मिळाला आहे. महिला आता या निवडणुकीत जास्त प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. आता आम्ही महिला मिळून गावाचा विकास करणार आहोत. आमच्या गावातील समस्या सोडवून प्रगतीपथावर आणू - कविता पाटील, कठोरा
आमच्या गावातही निवडून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. गावातील समस्या दुर करणे हेच मुख्य ध्येय आहे. गावात व्यायामशाळा, शौचालय आणि व्यायामशाळा बनवणार आहे. गावाचा विकास हेच आमचे ध्येय आहे - आरती पाटील, ममुराबाद.
आरक्षणाने महिलांना फायदा झाला आहे. आमच्या गावातील समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु, गावात शौचालये बांधणे, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याकडे आम्ही बारकाईने लक्ष देणार आहोत. गावाचा विकास हा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे - आशाबाई पाटील, गाढोदा