जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून सलग दुसऱ्या दिवशी ९५० पेक्षा अधिक ९५४ रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात जळगाव व भुसावळ येथील दोन तर चोपडा व बोदवड येथील प्रत्येक एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रोज होणाऱ्या मृत्यूची संख्याही गेल्या चार दिवसांपासून अचानक वाढली आहे. यात गुरुवारी सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील ४६ व ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यासह भुसावळ तालुक्यातील ७४ वर्षीय वृद्ध व ८४ वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील एक ७० वर्षीय महिला, बोदवड तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे.
चाळीसगाव, चोपड्यात संसर्ग वाढताच
जळगाव शहरात गुरुवारी ३१० नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. मृतांची संख्या ३२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरुवारी १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले. चाळीसगावात व चोपड्यात पुन्हा रुग्णवाढ समोर आली आहे. चोपड्यात १२१ तर चाळीसगावात ७२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह एरंडोलमध्ये ९८ तर भुसावळमध्ये ७० नवे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात सोमवारी आरटीपीसीआरचे १६३८ अहवाल समोर आले. यात २६६ बाधित आढळून आले आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या ४५३ वर आली असून मागील जवळपास सर्व अहवाल स्पष्ट झाले आहे.
भुसावळात केअर सेंटर सुरू
भुसावळ येथील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू झाले असून १२० क्षमतेचे हे सेंटर आहे. पहिल्याच दिवशी या सेंटरमध्ये १२ रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसतिगृहाची पाहणी तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदींनी केली.