लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये सातत्याने रुग्ण समोर येत आहेत. त्यात पिंप्राळा व खोटेनगरात गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर आले आहेत. शहरातील या हॉटस्पॉटमध्ये अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहराला कोरोनाने घातलेला विळखा अधिकच घट्ट होत आहे.
जिल्ह्यातील जळगाव शहरातच सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. केवळ शहरातीलच बाधितांचे प्रमाण बघितले असता ते थेट ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहे. याचा अर्थ शहरातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक जनता कोरोना बाधित झाली आहे. असाही एक अंदाज यातून समोर येतो. विशेष बाब म्हणजे ही एका दिवसाची नसून दोन तीन आठवड्यांची टक्केवारी असल्याने संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अधिक सतर्कता व अधिक काळजी अशा ठिकाणी महत्त्वाची असते, असे डॉक्टर सांगतात.
शहरातील हे आहेत हॉटस्पॉट
पिंप्राळा नियमीत सरासरी १० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण येत आहेत समोर
खोटे नगर सरासरी १० रुग्ण येत आहेत समोर
शिवकॉलनी, रामेश्वर कॉलनी, महाबळ, अयोध्यानगर, या भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात रुग्ण दररोज आढळून येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
संसर्ग टाळण्यासाठी हे करा
१ गर्दीत जाणे टाळा,
२ नियमीत मास्क वापरा, ते व्यवस्थित परिधान करा, अन्यथा मास्क असूनही ते नाका तोंडाच्या खाली असेल तर संसर्गाचा धोका असतो.
३ हात स्वच्छ धुवा, वारंवार नाका तोंडाला लावू नका, नाका तोंडाला होत लावण्याआधी ते स्वच्छ धुवा
४ ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, चव जाणे ही लक्षणे आढळल्यास तातडीने विलग व्हा, टेस्ट करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या
५ व्हायल इन्फेक्शन समजून स्वत:च निर्णय घेऊन आजार अंगावर काढू नका, यामुळे अन्य लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
कोट
संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्या भागात संसर्ग अधिक त्या भागात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. तीन नियम पाळा, लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्या. महत्त्वाचे म्हणजे वेळ घालवू नका, तपासणी लवकर करून लवकर उपचारांना सुरूवात करा. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी मनपा