जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आल्यानंतर आता कोविडनंतर होणाऱ्या शरीरातील गुंतागुंतीमुळे काही नवीन आजारही समोर यायला सुरुवात झाली आहे. त्यात मिस्क (एमआयएस-सी) अर्थात मल्टिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा - चिल्ड्रन याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने पालकांनी सतर्क रहावे, लक्षणे आढळल्यास तातडीने निदान करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
कोविडचे उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या मुलांमध्ये हायपर इम्युनो रिस्पॉन्स होतो. अर्थात कोविडशी लढण्यासाठी ज्या ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत, त्या शरीराशीच लढतात, यातून गुंतागुंत होऊन मिस्कचा धोका वाढतो. यात मुलांना ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, जीभ लाल होणे, रक्तदाब कमी होणे, हृदयाची गती वाढणे अशी लक्षणे प्राथमिक स्तरावर आढळतात, यात उपचारास उशीर झाल्यास गंभीर धोकेही उद्भवू शकतात, त्यामुळे लवकर निदान करून योग्य यंत्रणेत याचे तातडीने उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे जीएमसी बालरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे यांनी सांगितले. दरम्यान, कोविडनंतर मुलांमध्ये उद्भवणाऱ्या गुंतागुंतीसाठी चार क्रमांकाच्या कक्षात यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, औषधोपचारांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. त्यातच कक्ष, साहित्य याबाबतही नियोजन सुरू असल्याचे डॉ. सुरोसे यांनी सांगितले.