जळगाव- उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी प्राध्यापकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी नवनवीन प्रयोगांची गरज असून भविष्यात ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर अधिक भर असणार असल्याचे प्रतिपादन बेल्जीयमच्या जेंट विद्यापीठाचे प्रा.मार्टिन वाल्की यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इरॅस्मीस प्लस प्रकल्पांतर्गत शुक्रवारी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पार पडले़ त्याप्रसंगी प्रा. वाल्की बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, जेंट विद्यापीठातील प्रा. टिज्स रोट्साअर्ट, या प्रकल्पाचे समन्वयक प्रा.ए.एम.महाजन उपस्थित होते. प्रा.मार्टिन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन होणाऱ्या क्षमता विकसन केंद्राकडून प्राध्यापकांच्या अध्यापन क्षमता अधिक वाढाव्यात यासाठी कोणत्या प्रयत्नांची गरज आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात अधिक संवादाची गरज असून शिक्षण प्रणालीत आॅनलाईन अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रश्न विचारून त्याचा डाटा जमा केला जावा असे ते म्हणाले. जेंट विद्यापीठात यापध्दतीचे प्रयोग केल्यामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण ३० टक्यांवरून ८० टक्कयांपर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले.क्षमता विकसनाचे नवीन अभ्यासक्रम सुरू होणारप्रा. टिज्स रोट्साअर्ट यांनी विविध सॉफ्टवेअरविषयी माहिती दिली. प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी या क्षमता विकसन केंद्राचा प्रारंभ जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती यावेळी दिली. या केंद्रात नवनवीन उपकरणे ठेवले जातील असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात समन्वयक प्रा.ए.एम.महाजन यांनी क्षमता विकसनाचे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली. तसेच इरॅस्मस प्लस योजनेविषयी देखील माहिती देवून गेल्या दोन वर्षात या योजनेअंतर्गत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी या प्रकल्पांतर्गत युरोपियन देशातील विद्यापीठांना भेट देवून आलेले प्रा.राम भावसार, प्रा.मनिष जोशी, प्रा.विकास गिते यांनी तेथील अनुभव व तेथील शिक्षणप्रणाली बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भुषण चौधरी यांनी केले. प्रा.रमेश सरदार यांनी आभार मानले. तसेच गुरूवारी प्रा़ मार्टिन व प्रा.टिज्स यांनी प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, वित्त व लेखाअधिकारी एस.आर.गोहिल, उपकुलसचिव वसंत तळेले यांच्या समवेत चर्चा करून क्षमता विकसन केंद्रासाठीचे मनुष्यबळ, निधी आणि या केंद्रासाठीची जागा याबद्दल सविस्तर चर्चा केली.
भविष्यात ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 7:21 PM