लोकमत न्यूज नेटवर्क
रावेेर : एकीकडे शेती उत्पादन दुप्पट करण्याचे दिवास्वप्न केंद्र सरकारकडून दाखवले जात असले तरी गत तीन वर्षांपासून बीटी कापसाच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. जैवतंत्रज्ञानावर आधारित डबल बीटी कापसाचे बियाणे लागवड करूनही रसशोषक किडी व बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव होऊन फवारण्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना गत तीन वर्षांपासून निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्नात दरवर्षी घट येत आहे. यामुळे शासनाच्या जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाणे निर्मितीतील गुणनियंत्रण करणाऱ्या शासकीय रासायनिक प्रयोगशाळांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून पांढरे सोने म्हणून गणले जाणाऱ्या कापसाच्या पिकावर सारी दारोमदार राहत असल्याने पूर्वहंगामी बागायती कापूस व जिरायत कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते. गत तीन वर्षांपासून बळीराजाचे दुर्दैव म्हणावे? की बीटी कापूस बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची उडवली जाणारी थट्टा म्हणा, बीटी कापसाच्या उत्पादनाचा रसशोषक किडी व बोंडअळीमुळे फरदड तर सोडाच. मात्र, पूर्वहंगामी कापसाच्या एक्क्याचा अर्ध्यातच गाशा गुंडाळला जात असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचा अर्ध्यावरती डाव मोडत असल्याने त्यावर होणारा उत्पादन खर्चही निघत नसल्याने गत तीन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘घाटे का सौदा’ होत आहे. फूल व फळधारणेच्या अवस्थेत पांढऱ्या सोन्याची हिरवी स्वप्ने बळीराजाच नव्हे, तर बांधावर न पोहोचणारी शासन यंत्रणाही रंगवून खरिपाच्या पीक आणेवारीचे आकडे ५० पैशांपेक्षा जास्त रंगवत असल्याने बळीराजाचे खऱ्या अर्थाने निसर्गच नव्हे, तर कापूस बियाणे निर्मात्यांपासून, व्यापारी ते थेट शासन यंत्रणेकडूनही फसवणूक होत असल्याचा आरोप बळीराजातून होत आहे.
एकीकडे शासन राज्यकर्ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा बोलघेवडेपणा करीत असताना दुसरीकडे शेती उत्पादन निम्म्यापेक्षा जास्त घटत असल्याची कापूस उत्पादनाची भीषण परिस्थिती त्या बोलघेवड्यापणाला हरताळ फासणारी ठरली आहे. बीटी कापूस बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे गुणनियंत्रण वस्तुत: केले जाते की नाही? की नुसतेच चिरीमिरीतून कागदी घोडे नाचवत ‘टेस्टेड ओके’ची रबरी शिक्के मारले जातात? असा संताप कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. डबल बीटी कापूस बियाणे असल्याने त्यावर रसशोषक किडी वा बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायला नको. मात्र, बीटी कापसाच्या बियाण्यांचे बीजांकुरण झाल्यापासूनचे दोन पानांवर कपाशी असताना रसशोषक किडींचे आक्रमण व्हायला सुरुवात होत आहे. संकरित वाणाचे कापसाच्या पिकांपेक्षा जास्त महागड्या कीटकनाशकांच्या फवारणी व उत्पादन खर्चही करावा लागत असल्याने अशा बीटी अर्थात जैवतंत्रज्ञानाला काय अर्थ उरतो? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे. कापूस बियाणे कंपन्यांच्या जैवतंत्रज्ञानाची गुणवत्ता घसरली का? की जैवतंत्रज्ञान निसर्गापुढे फोल ठरतेय? यासंबंधी शासनाकडून संशोधन व उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे.
बी.टी. कापूस लागवड वर्षानुवर्षांपासून आपल्याकडे होत असल्याने निसर्गत: असलेल्या किडींची त्या कापसाच्या पिकातील प्रतिबंधक जीन्सवर मात करण्यासाठीची प्रतिकार शक्तीही दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असल्याचा निसर्गदत्त नियमानुसार अंदाज आहे. यावर्षी उशिराने सुरू असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे बीटी बियाणांची गुणवत्ता घसरतेय, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, प्रतिकारशक्ती फोफावलेल्या त्या रसशोषक किडी वा बोंडअळीवर मात करणारे अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाची गरज स्पष्ट होत आहे.
-एम.जी. भामरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, रावेर