लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथे कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण समोर आल्यानंतर प्रशासनाने आता खबरदारीचा उपाय म्हणून जूनच्या शेवटच्या आठवड्यात शंभरपेक्षा अधिक नमुने दिल्ली येथे तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर जिल्ह्यात या व्हेरिएंटचे आणखी काही रुग्ण आहेत का? हे समजणार आहे. राज्यातील काही मोजक्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले असून, त्यात जळगावचा समावेश असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
मात्र, हे सातही रुग्ण अगदी ठणठणीत असून, कोणाचीही प्रकृती गंभीर झाली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यातील शंभर नमुने मे महिन्याच्या अखेरीस दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण असल्याचे जाहीर केले होते. त्यात जळगाव जिल्ह्यात सात रुग्ण असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देत हे रुग्ण बरे झाल्याचे सांगितले होते.
जिल्ह्यात काय खबरदारी?
- रुग्ण ज्या भागात आढळून आले होते, त्या भागात मोठी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.
- त्या सातही रुग्णांची पुन्हा तपासणी करून त्यांच्या प्रकृतीवर प्रशासन लक्ष ठेवून होते.
- त्या सात रुग्णांच्या नातेवाइकांचीही तपासणी करण्यात आली होती. ते सर्व निगेटिव्ह आले होते.
- जून महिन्यात आता शंभरपेक्षा अधिक नमुने दिल्ली येथे प्रयोगशाळेत पाठविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
- ज्या भागात हे रुग्ण आढळून आले होते त्या भागावर प्रशासनाचे विशेष लक्ष होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात दररोज ४५०० टेस्ट
१ जिल्ह्यात सरासरी रोज ४५०० तपासण्या होत आहेत. यात आता आरटीपीसीआर तपासणी अधिक करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
२ मध्यंतरी तपासण्यांची संख्या ही दहा हजारांवर गेली होती. त्यानंतर तपासणीसाठी समोर येणाऱ्यांचे प्रमाण घटल्याने तपासण्या कमी होत आहेत.
३ जळगाव शहरात सर्वाधिक तपासण्या केल्या जात आहे. एकत्रित जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी अडीच हजार आरटीपीसीआर व दोन हजारापर्यंत ॲंटिजन चाचण्या केल्या जात आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण : १,४२,०७२
बरे झालेले रुग्ण : १,३८,४१२
उपचार घेत असलेले रुग्ण : १०९१
कोरोनाचे मृत्यू : २५६९
गृहविलगीकरण : ७०७