लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आणि बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, ही साखळी पुन्हा एकदा ब्रेक झाली असून, शुक्रवारी ५६ नवे रुग्ण आढळून आले असून, ५१ रुग्ण बरे झालेले आहेत. दरम्यान, शहरातील एका बाधितासह जिल्ह्यातील ३ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरासह जिल्हाभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढलेले होते. शुक्रवारी ८१४ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या तर १६०२ ॲन्टिजन चाचण्या झालेल्या होत्या. दरम्यान, यावल तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ६६ वर्षीय पुरूष आणि जळगाव शहरातील ६२ वर्षीय पुरुष या बाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मृतांची संख्या १३१२ झाली असून, मृत्यू दर २.३९ टक्के झाला आहे.
व्यापारी तपासणीचे अहवाल आज
शहरात १८२ रुग्ण चाचण्या झाल्या असून, यात ११२ चाचण्या या व्यापाऱ्यांच्या झालेल्या आहेत. दाणा बाजारातील व्यापारी, कामगारांच्या तपासणीचे अहवाल शनिवार समोर येणार आहेत. या ठिकाणाहून अधिकाधिक तपासण्या करण्याचे नियोजन मनपाने केले आहे. शहरातील गेंदालाल मील परिसर २, नागेश्वर कॉलनी १, विनायक नगर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.