जळगाव : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने कारवाई करण्यात येत असून आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पिस्तूल, तलवारी, एमडी ड्रग्स, गुटखा, गांजा असा एकूण सुमारे चार कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होऊन १६ मार्चपासून आचारसंहिता लागली. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलिस दलाने १६ मार्चपासून कारवाई वाढविली. यामध्ये आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे. यात ९ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत तर एका गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार २५० जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून २ हजार ७६४ जणांना अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.
२ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्तजिल्ह्यात अवैध धंदे चालकांसह अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीच्या कारवाई केल्या असून त्यामध्ये एक कोटी ७ लाख रुपयांची २ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.
८३ लाखांचे एमडी जप्तआचारसंहिता काळात गावठी पिस्तुल, तलवार, चाकूच्या १८ कारवाई करण्यात आल्या असून त्यामध्ये ५ गावठी पिस्तुल, ७ जिवंत काडतूस, १२ तलवारी असा एकूण १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर ४ गांजाच्या कारवाई केल्या असून त्यामध्ये १० लाख ७७ हजार रुपयांचा ११४ किलो गांजा जप्त केला आहे. तसेच गुटख्याच्या १४ कारवाईमधून १ कोटी ७९ लाख ८६ हजारांचे ९१ हजार ६९४ पुडे जप्त केले. तसेच आमली पदार्थ असलेल्या एमडीच्या २ कारवाई झाली असून त्यामध्ये ८२ लाख ८५ हजार रुपयांचे एमडी जप्त केले. तर २० लाख रुपयांचे मौल्यवान दागिने असा एकूण ७७४ कारवाईमधून सुमारे ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात आले. बीएसएफ व अन्य जिल्ह्यातील तुकड्या दाखलनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बीएसएफ, कर्नाटक स्टेट फोर्स, केरळ स्टेट फोर्स यासह अन्य पोलिस तुकड्या दाखल झाल्या आहेत. अजून पोलिस बळ येणार असून आलेले तुकडी कामालाही लागली आहे.