चोपडा/ अडावद (जि. जळगाव) : कमळगाव येथे सोमवारी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली.
३० रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते.
घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.