जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या गेल्या २४ तासात सुमारे २०७२ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ६३ हजार १४६ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले आले आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.जळगाव जिल्हा राज्यात ११ व्या स्थानीजिल्हाधिकरी राऊत म्हणाले की, मे अखेरला जिल्ह्यात दैनंदिन २०० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु आता गेल्या दोन महिन्यात तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीमध्ये दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात ११ व्या स्थानी पोहोचला असून जिल्ह्यात ७ आॅगस्ट रोजी १९११ तर ८ आॅगस्ट रोजी २०७१ अशा एकूण ३९८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.यात रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या २३३७ तर आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १६४५ आहे. सध्या राज्यात दैनंदिन सर्वाधिक १२ हजार ४०२ चाचण्या नाशिक जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्या केल्याने बाधित रुग्ण शोधण्यास मदत होत असून कोरोनाची साखळी खंडित करण्यात मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.३ हजार ६९८ रुग्णांवर उपचारकोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्ण शोधण्यास मदत होत असल्याने अशा बाधित रुगणांवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होणाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यासही मदत झाली आहे. जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यत १३ हजार ८८७ बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ९ हजार ५८८ रुग्ण म्हणजेच ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहे. तर सध्या जिल्ह्यात ३ हजार ६९८ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत ६०१ बाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी १२ टक्के असलेला मृत्युदर सध्या केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ४.३२ टक्क्यांवर आणण्यात प्रशासनास यश आल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.घाबरू नका, दक्षता घ्याजिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाला घाबरु नये, परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत आपल्या नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
एकाच दिवसात दोन हजाराहून अधिक चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:08 PM