जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमध्ये सकाळी व दुपारी रस्त्यावर शांतता होती, मात्र संध्याकाळी बँका व कार्यालयांमधून अधिकारी, कर्मचारी घरी जात असल्याने रस्त्यावर काहीसी वर्दळ वाढल्याचे शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, सकाळी जे कोणी बाहेर दिसले त्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठविले.
गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असलेल्या कोरोनाच्या नियंत्रणासाठी जळगाव महापालिका क्षेत्रात जाहीर केलेल्या १२ ते १४ मार्च दरम्यानच्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील सकाळ, दुपार व संध्याकाळच्या स्थितीचा आढावा घेतला असता संध्याकाळी काहीसी वर्दळ दिसून आली.
————————————————-
सकाळी दूध खरेदी झाल्यानंतर रस्ते सामसूम
गुरुवारी रात्री जनता कर्फ्यूला सुरुवात झाल्यानंतर खरे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. एरव्ही सकाळपासून दुकाने, खाद्य पदार्थ, चहा विक्री व इतर व्यवसायांची दुकाने थाटण्याची असणारी लगबग शुक्रवारी दिसली नाही. त्यामुळे सर्वच बाजारपेठेच्या भागात शांतता होती. मात्र सकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात दूध खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच रस्त्यावर दिसत होत्या. या शिवाय सकाळी मंदिरात जाणारे भाविकही घरीच असल्याने शहरातील विविध मंदिरात दररोज दिसणारे चित्रही बदललेले होते.
भाजीपाला नाही की फळे विक्री नाही
दररोज सकाळी वेगवेगळ्या भागात भाजीपाला, फळे विक्रेते फिरुन व्यवसाय करीत असतात. मात्र शुक्रवारी गल्लोगल्लीमध्ये भाजीपाला, फळ विक्रेत्यांचाही आवाज ऐकू येत नव्हता.
विना प्रवासी फिरणाऱ्या रिक्षा चालकाला दंडुका
सकाळी शहरातील विविध मार्केटमध्ये शांतता होती, मात्र सुभाष चौकात काही जण फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना घरी पाठविले. या वेळी काहीसा दंडुक्याचाही धाक दाखवावा लागला. यात एक रिक्षावाला विनाकारण फिरताना आढळून आल्याने त्याची चौकशी केली व त्यात प्रवाशीही नसल्याने त्याला पोलिसांना दंडुका देत चांगलाच समज दिला.
————————————————-
दुपारी मेडीकल, कृषी विषयक दुकानांवर शांतता
जनता कर्फ्यू दरम्यान मेडिकल, कृषी विषयक दुकाने, ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय सुरु ठेवले तरी ग्राहकी नव्हती. जनता कर्फ्यूमुळे नागरिक घराबाहेर पडले नाही की बाहेर गावाहून कोणी न आल्याने या सर्व ठिकाणी शांतताच होती. रेल्वेस्थानक रस्त्यावर असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात तर अनेक जण हातावर हात धरुन बसलेले होते. एटीएम, बँका सुरू असल्या तरी तेथेही ग्राहकांअभावी शांतता होती.
घरी करमत नाही
सकाळी अनेक जण घरीच थांबले, मात्र दुपारी अडीच ते तीन वाजे दरम्यान फुले मार्केट व बाजारपेठेत काही जण फेरफटका मारायला आले होते. त्यांना या विषयी विचारले असता घरी करमत नसल्याने बाहेर थोडे फिरायला आलो, असे सांगितले.
अतिक्रमण निर्मूलन पथक ठाण मांडून
जनता कर्फ्यू दरम्यान कोणीही काहीही विक्री करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून सुभाष चौक परिसरात मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक ठाण मांडून होते. या पथकातील काही जण बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरून पाहणी करीत होते. या वेळी मनपा उपायुक्तांनी वाहनात फिरुन शहरातील स्थितीचा आढावा घेतला.
हॉटेलची साफसफाई
जनता कर्फ्यूत हॉटेलमध्येही ग्राहकी नसल्याने भजे गल्ली भागातील काही हॉटलेचालकांनी हॉटेलची साफसफाई सुरू केली होती.
————————
संध्याकाळी घरी परणाऱ्यांची वाढली वर्दळ
जनता कर्फ्यूदरम्यान बँका, शासकीय कार्यालयातून घरी परतणाऱ्या व बाहेर गावाहून येणाऱ्या काही मंडळींमुळे संध्याकाळी पाच ते साडे सहा वाजेपर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती. मात्र दररोजच्या तुलनेत ही संख्या कमीच होती. आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरुच असल्याने संध्याकाळी काही जण बस, रेल्वेने व इतर खाजगी वाहनांनी शहरात आल्याने त्यामुळे रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर धावत होती.
रुग्णालय परिसरात वाहनांची संख्या अधिक
एरव्ही बाजारपेठ भागात दररोज मोठ्या प्रमाणात वाहने लावलेली दिसून येतात. शुक्रवारी या भागात वाहने नव्हती, मात्र ज्या भागात रुग्णालय अधिक आहे, अशा भागात चारचाकी, दुचाकी वाहने लावलेली होती. यात भास्कर मार्केट परिसर, रिंग रोड, प्रतापनगर इत्याही भागात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वाहने दिसून आली.
भिकाऱ्यांचे हाल
सर्वच व्यवहार, हॉटेल, चहा-नाश्त्याची दुकाने बंद असल्याने दररोज शहरात भिक मागणाऱ्यांचे शुक्रवारी मोठे हाल झाले. खायला कोठेच काही मिळत नसल्याने काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. कोणी आर्थिक मदत केली तरी खायला कोठून काही मिळत नसल्याने अनेकांनी रिकाम्या पोटीच दिवस काढला. यात सुभाष चौकात तर अनेक जण झोपून गेले होते. यात टॉवर चौकात एका हॉटेलवर असलेल्या नळाचे पाणी पिऊन एका आजीबाईने पोटाला आधार दिला.