तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, १५ जानेवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे तयारी अंतिम टप्प्यात आली असून, प्रत्येक गावातील मतदान केंद्रांचीही संख्या निश्चित झाली आहे.
सर्वात कमी उमेदवार व केंद्र ‘आवार’ला
तालुक्यात असोदा येथे सहा प्रभागांमधील १७ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासाठी १२ मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील मतदान केंद्रांची संख्या पाहता असोदा येथील ही संख्या सर्वाधिक आहे. मात्र कानळदा येथे सहा प्रभागांमधील १७ जागांसाठी ६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. येथे उमेदवार जास्त असले तरी मतदान केंद्र मात्र सहाच आहे. सर्वात कमी दोन मतदान केंद्र आवार येथे असून, तेथे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसे तुरखेडा येथे आठ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, मात्र तेथे मतदान केंद्र तीन आहेत.
सर्वाधिक मनुष्यबळही आसोद्यात
कानळदा येथे सर्वाधिक उमेदवार असले तरी निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वाधिक मनुष्यबळ आसोदा येथेच राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी चार अधिकारी व एक कर्मचारी असे पाच जणांचे मनुष्यबळ राहणार आहे. त्यामुळे आसोदा येथे १२ मतदान केंद्रांसाठी ६० जणांचे तर सर्वाधिक उमेदवार असलेल्या कानळदा येथे सहा मतदान केंद्रासाठी ३० जणांचे मनुष्यबळ राहणार आहे.
तीन ठिकाणी एकही मतदान केंद्र नाही
निवडणूक होऊ घातलेल्या तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी मोहाडी व डिकसाई ग्रामपंचायत बिनविरोध ठरली असून, नशिराबाद येथे नगरपंचायतीसाठी सामूहिक माघार घेण्यात आल्याने या ठिकाणी मतदान होणार नाही. त्यामुळे या तीनही ठिकाणी मतदान केंद्र नाही.