कुंदन पाटील, जळगाव: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्य मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महामार्गावरच्या अपघातांमधील बळींच्या संख्येत सुदैवाने १२ टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण रस्त्यांनी यंदाच्या वर्षात घेतलेल्या बळींची संख्याही चिंतेत टाकणारी आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात झालेल्या अपघातांचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. २०२३ च्या तुलनेत यंदा झालेल्या अपघातांचा आकडा चिंतेत टाकणारा आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ दारुच्या नशेसह घरी परतण्याच्या अतिघाईमुळे या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे.
‘राज्य मार्ग’ पुढे
महामार्गाच्यातुलनेत यंदा राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असून त्यातील बळींची संख्याही जास्त असल्याचे या पडताळणीत दिसून आले आहे.गेल्यावर्षी महामार्गावर ४५ तर राज्यमार्गावर ५० जणांचा बळी गेला होता. यंदा मात्र हा आकडा अनुक्रमे ४० व ६७ असा असल्याचे दिसून आले आहे. राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये बळी जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या अतिशय चिंतेचे बाब आहे. अनेक जण नियम मोडीत काढतात आणि भरधाव वेगाने वाहन हाकत असल्याने अपघातांमध्ये मृत्यू पावत असल्याचा निष्कर्ष प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदविला आहे.
दृष्टीक्षेपात मार्गनिहाय झालेले अपघात दृष्टीक्षेपात
मार्ग-२०२३-२०२४-वाढ
- राष्ट्रीय महामार्ग-४५-४०- (-१२)
- राज्य मार्ग-५०-६७- (+३४)
- मुख्य जिल्हे रस्ते-०४-०५- (+२५)
- अन्य जिल्हे रस्ते-१३-०८- (-३९)
- ग्रामीण रस्ते-३६-३२- (-१२)
- स्थानिक रस्ते-१०-०६-(-४०)