भुसावळ : वाढती गुन्हेगारी पाहता शहरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे मोस्ट वॉन्टेड रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात येत आहे. यात येथील एका गुन्हेगारावर औरंगाबाद पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी २५ रोजी गुन्हेरांची ओळख परेड घेतली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ पोलीस वेगवेगळी पावले उचलत आहे. यात हद्दपारी तसेच एमपीडीए कारवाईसह कोबिंग ऑपरेशनही केले जात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्याचे काम सुरू असून सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहे.
धार्मिक सण, उत्सव काळात शहरासह तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. सोबतच शांतता भंग होऊ नये याकरिता डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह सर्वच ठाणेदार सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करीत आहेत.
आर्म ॲक्टचे गुन्हे घटले
शहर व तालुक्यामध्ये सन २०१९-२० ला तब्बल २२ आर्म ॲक्टच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. चालू वर्षात अद्याप शस्त्र बाळगल्याच्या फक्त ३ घटना समोर आल्या आहेत. एकंदरीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर पोलिसांनी बराच अंकुश मिळवला आहे.
वर्षभरात १९ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
कोरोना काळातही पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरणाऱ्या १९ गुन्हेगारांना पोलिसांनी यावर्षी हद्दपार केले आहे. याशिवाय ३ गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पथदिवे बंदबाबत पालिका प्रशासनाला दिले पत्र
शहरातील रस्त्यांचा विषय ज्वलंत असताना त्यात भर म्हणून अनेक पथदिवेही बंद पडलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. अनेक सराईत गुन्हेगार हे अंधाराचा फायदा घेत गुन्हे करताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही पथदिवे बंद असल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. याकरिता पालिका प्रशासनाने त्वरित पथदिवे सुरू करावे, असे पत्र डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
गुन्हेगारांची घेतली ओळख परेड
गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे संशयित व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना बोलावून त्यांची ओळख परेड व सखोल चौकशी २५ रोजी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केली.
मोस्ट वॉन्टेड जावेद अली स्थानबद्ध
महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात सिनेस्टाईल चोऱ्या करणारा भुसावळातील अट्टल गुन्हेगार जावेद ऊर्फ लंगअली
गरूअली इराणी (३०) पापा नगर, इराणी मोहल्ला यास एक वर्षासाठी एमपीडीएखाली स्थानबद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद गुन्हे शाखेने ही कारवाई करीत आरोपीला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तर आगामी काही दिवसात गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई करण्याचे नियोजन भुसावळ पोलीस प्रशासनाने केले आहे.