लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड ते पावणेदोन महिन्यांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. सध्या जिल्ह्यात १२ हजारांच्या जवळ उपचार घेणारे रुग्ण आहेत. या रुग्णांवर जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये शेकडो डॉक्टर उपचार घेत आहेत. त्यामुळे आता या डॉक्टरांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉक्टर रुग्णांवर उपचार करून थेट घरी जात असल्याने आता कुटुंबीयांचेदेखील आरोग्य धोक्यात आले आहे. डॉक्टर आई-बाबा कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी आल्यावर त्यांच्याजवळ जायचे कसे, असा प्रश्न आता त्यांच्या चिमुरड्यांनादेखील पडला आहे.
शहरात कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांनादेखील कुटुंब आहे. प्रत्येकाच्या घरात मुले, वृद्ध आई-वडील आहेत. रुग्णाचा जीव वाचवल्यावर मिळणाऱ्या समाधानाला नक्कीच तोड नाही; पण त्यासोबतच सध्या एक नवी काळजी डॉक्टरांच्या मनात आहे. ती म्हणजे आपण आपल्या घरच्यांना तर कोरोना देणार नाही.
आधी कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना १४ दिवस क्वारंटाईन केले जात होते. नंतर हा कालावधी पाच दिवसांवर आला. आता मात्र सीसीसीमध्ये काम करणारे डॉक्टर रुग्णांवर उपचार करून थेट आपल्या घरीच जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या कुटुंबीयांमध्येच कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलच बहुतेक डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले होते.
कोट
कर्तव्यदेखील महत्त्वाचे
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोविड केअर सेंटरमध्ये काम करीत आहे. येथे किचन सांभाळतो. घरात मुलगी आणि पत्नी आहे; पण आम्ही पूर्ण सुरक्षा घेऊन काम करतो. त्यात कोणतीही कुचराई करीत नाही. कुटुंब महत्त्वाचे आहेच; पण सध्या कर्तव्यदेखील महत्त्वाचे आहे.
- कलंदर तडवी
गेल्या काही दिवसांपासून कामाचा ताण वाढला आहे. घरी गेले की मुले जवळ यायचा प्रयत्न करतात; पण आधी स्वच्छता महत्त्वाची आहे. या वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे कायमच चिंता वाटते.
- महिला आरोग्य कर्मचारी
गेल्या ऑगस्ट महिन्यापासून विविध कोविड केअर सेंटरमध्ये काम करत आहे. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. घरी कोरोना नेणार तर नाही, अशी भीती सुरुवातीला वाटायची. पण आता त्याची फारशी भीती वाटत नाही. घरात वेगळ्या खोलीतच राहतो.
- डॉक्टर.
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर - २५
सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण - १३१२