हरताळा, ता. मुक्ताईनगर : डोळ्यात न दाखवतानाही जो आभाळाएवढे प्रेम करतो, त्याला बाप नावाचा राजा माणूस म्हणतात. पितृ देवो भव, असे आपल्या संस्कृतीत म्हटले जाते ते यामुळेच. जो बाप हिमालयासारखा नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला व आई मी लहान असतानाच वारली आणि नंतर बापानेच आईचीही भूमिका पार पाडली, अशी भावना येथील भुजंगराव गोविंदराव देशमुख यांनी व्यक्त केली.
भुजंगराव हे इयत्ता पाचवी वर्गात असतानाच त्यांच्यावरील आईचे कृपाछत्र हरपले. वडील कमी शिक्षित असताना त्या काळात मोठे वडील नारायणराव भिकनराव यांनीच पालन पोषण करत भुजंगराव यांना वाढविले.
भुजंगराव यांनाही व्हावे लागले आईसुद्धा
भुजंगराव यांची आई लहानपणीच वारली, तशी त्यांची पत्नीही त्यांची मुले लहान असतानच वारली व त्यांनीदेखील आपल्या बापाप्रमाणे मुलांचाच विचार करून जीवनाची वाटचाल केली. पत्नीच्या निधनानंतर दुसरी पत्नी करण्याचा सल्ला मित्रमंडळींनी व काही हितचिंतकांनी दिला; परंतु त्यांनी रोखठोकपणे दुसऱ्या विवाहाचा सल्ला नाकरला. स्वत:ची आई लहानपणीच वारल्यानंतर त्यांच्या मुलांची आईदेखील लहानपणी वारल्याने भुजंगरावांच्या जीवनात हा खूपच कठीण प्रसंग आला.
मुलांसोबत खंबीरपणे उभे
येथील इयत्ता आठवी पास असलेले भुजंगराव हे आता सत्तरीत असून, मोलमजुरी करीत त्यांनी दोघा मुलांना वाढविले. एक मुलगा मुक्ताईनगर पोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट पोस्ट मास्टर आहे, तर दुसरा मुलगा गावातीलच विकास सोसायटीमध्ये स्वस्त धान्य दुकानात सेल्समन आहे.
कुटुंबाचे प्रेम हेच सर्वस्व
जीवनात खूप दु:ख पाहिले. गरिबीचे चटके सहन केले; परंतु मुले, सुना व नातवंडे यांचे आज मिळणारे प्रेम हे साऱ्या कटू आठवणी दूर सारतात. कुटुंबाचे प्रेम हे रणरणत्या उन्हात राहिल्यानंतर पुढे जाऊन सावली मिळावी, त्याप्रमाणेच आहे, अशी ही भावना भुजंगराव यांनी व्यक्त केली.
मुलांच्याही दृष्टीतून ठरला बाप हीरोच...
आईची जागा बाप घेऊ शकत नाही; परंतु मुलांच्या जीवनात बापाचेही महत्त्वाचे स्थान असते. बापही कधी- कधी आपल्या मुलांच्या जीवनात आईसुद्धा बनतो. संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई; पण आयुष्याच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा. वडीलही मुलांच्या जीवनातील पडद्यामागचे हीरो असतात, अशी भावना भुजंगरावांची दोन्ही मुले व्यक्त करतात.