चाळीसगाव : घरात मुलीचा विवाह असल्याने आनंदाचे वातावरण होते. तथापि आईच्या मृत्यूचा दुर्दैवी प्रसंग मंगळवारी सितामाई नगरातील भोकरे परिवारावर कोसळला. काळजावर दुःखाचा दगड ठेवत परिवाराने हा सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला. या घटनेमुळे सितामाई नगरासह वाणी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. मुलीचे हात पिवळे होणे. ही कोणत्याही आईसाठी आनंददायी स्वप्नपूर्ती असते. मांगल्याचे हे क्षण अनुभवणे हा जीवनाचा सार्थकी सोहळाच असतो. तथापि, सोहळा पाहण्याआधीच संगीता राजेंद्र भोकरे (५०, कोठावदे) यांना मृत्यूने गाठले. मंगळवारी मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईची प्राणज्योत विझली. संगीता राजेंद्र कोठावदे या प्राथमिक शिक्षिका म्हणून तरवाडे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेंद्र भोकरे हे उमरखेड, ता. भडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी मयुरी हिचा विवाह मंगळवारी लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात सायंकाळी मुहूर्तावर पार पडणार होता. मात्र संगीता यांची प्रकृती खालावल्याने विवाह दुपारीच उरकण्यात आला. त्यांच्या पश्चात सासू, पती आणि बारावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे.डोळे पाणावलेले, हुंदका आणि मंगलाष्टकेसंगीता भोकरे या गत सहा महिन्यापासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांना स्वादूपिंडाचा कर्करोग होता. उपचारही सुरुच होते. मुलीचा विवाह सोहळा असल्याने घरात मंगलमय वातावरण होते. मंगळवारी सकाळीच संगीता यांची प्रकृती खालावली. सव्वा दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह घरात ठेवत आणि दुःखाचा डोंगर पेलत भोकरे परिवाराने मुलीचा विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेबारा वाजता साध्या पद्धतीने मयुरी व नीलेश अमृतकार यांचा विवाह झाला. सायंकाळी साडे सहा वाजता संगीता यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.
मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 6:07 PM
मुलीच्या लग्नाच्या दिवशीच मुलीच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव येथील सितामाई नगरात घडली
ठळक मुद्देचाळीसगावातील दुर्देवी घटना : सितामाई नगरातील भोकरे परिरावर शोककळा