या वेळी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सत्यशोधक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष शंभू सोनवणे, मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील व दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी उपस्थित होते. या वेळी मनोगतात आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांनी भारतीय समाज व्यवस्थेच्या जडणघडणीत स्त्रियांचा वाटा हा अतिमहत्त्वाचा आहे. स्त्रीमध्ये कल्पकता असून, या कल्पकतेतूनच शेतीचा व संसाराचा शोध लागला असल्याचे कांबळे यांनी सांगितले. प्रास्ताविक सचिन पाटील यांनी तर सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. आभार गोपाल दर्जी यांनी मानले.
उल्लेखनीय कार्य महिलांचा सन्मान :
मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मीना संजय मोरे, प्रतिभा विजय नेमाडे, मीरा देवीदास मोरे, प्रा.डॉ. शेख फिरदोस जमाल शफियोड्डीन व सोनाली मधुकर साळुंखे या पाच महिलांना साडी, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविले. तसेच या वेळी मूकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचा फाउंडेशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
इन्फो :
समाजाबद्दल बांधिलकी जोपासणे गरजेचे
मिलिंद कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सामाजिक बांधिलकी प्रत्येक नागरिकाने जोपासली पाहिजे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने मनाशी ठेवली पाहिजे. समाजाप्रति ऋण व्यक्त करण्याकरिता अनेक मार्ग आपल्यासाठी आहेत, ते प्रत्येकाने अनुसरले तर समाज विकासाला गती मिळेल; तसेच या माध्यमातून महापुरुषांचे कार्य प्रेरणादायी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.