लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुलगा कामधंदा करत नसून, त्यात त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे संसाराचा गाढा सुनेच्या धुणीभांडी करून मिळणाऱ्या पैशावरच सुरु आहे. सासु व सुनेच्या वादानंतर सुनेने चक्क सासुबाईलाच घराबाहेर काढुन दिल्याचा प्रकार शहरातील अयोध्या नगरात घडला आहे. सुनेने घरातून काढून दिल्यानंतर या सासूबाईचा आठ दिवसांपासून मुक्काम जळगाव रेल्वे स्टेशनावर आहे. दारुड्या मुलापायी ऐन वृद्धपकाळात आपल्या रस्त्यावर यावे लागले असल्याची खंत या वृद्धेने'' लोकमत'' शी बोलताना व्यक्त केली.
शहरातील अयोध्या नगरात कमलबाई(नाव बदललेले) गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. मुलगा एका वर्कशॉप वर नोकरीला आहे. त्याला दोन मुले असून,त्याची पत्नी व आई कमलबाई हे एकत्र राहत होते. सर्व संसार सुरळीत सुरू असताना, मुलाला अचानक दारूचे व्यसन लागले. या व्यसनामुळे त्याने नोकरीही सोडली. दारूसाठी इकडून-तिकडून पैसे आणून व्यसन करू लागला. यामुळे त्याच्यात व पत्नीत दररोज वाद होऊ लागले. मुलाने नोकरी सोडल्यामुळे सुनेलाच संसार आणि मुलांचे शिक्षण करण्यासाठी घरोघरी जाऊन धुणीभांडी करावी लागत आहे. यातून तुटपुंजी पैशावर घर कसेबसे चालत असतांना, सुनेला कालांतराने सासूचे पोट भरणे अवघड वाटू लागले. यामुळे दररोज सासू व सुनेत वाद होऊ लागले आणि एक दिवशी सुनेने चक्क सासूबाईलाच घरातून बाहेर काढले.
इन्फो :
पाठच्या बहिणीनेही केला दरवाजा बंद
सुनेने घरातून काढल्यानंतर कमलबाई या शनीपेठेतील आपल्या सख्या बहिणीकडे गेल्या. यावेळी बहिणीने माझेच पोट मला भरायला महाग आहे, सून खायला वेळेवर देत नाही, माझेच हाल होत असताना, तुला कुठे राहू देऊ..असे एक ना अनेक कारणे सांगून कमल बाईला राहण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे कमलबाई यांनी शहरात दुसरे आता कुणीही नातलग नसल्याने रेल्वे स्टेशनवर राहत आहेत. सख्या बहिणीनेही घरात न घेतल्याने कमल बाई यांना अश्रू अनावर झाले होते.
इन्फो :
तर आता स्टेशनचं झाले माझे घर
सुनेने घराबाहेर काढले आणि बहिणीनेही घरात न घेतल्याने कमलबाई या आठवडाभरापासून स्टेशनवर राहत आहेत. ''लोकमत'' प्रतिनिधीने कमलाबाई याना जेवणाबद्दल विचारले असता, त्यांनी स्टेशनवर शहरातील काही नागरिक सकाळ व सायंकाळी नियमित जेवण आणून देत असतात. या ठिकाणी आल्यापासून दररोज कुणी ना कुणी जेवण आणून देते. त्यामुळे अन्न व पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यात या ठिकाणी शांतता असल्याने जीवाला बरे वाटत आहे. त्यामुळे आता सून व मुलगा जरी घ्यायला आले, तरी आपण त्यांच्या सोबत जाणार नाही. आता रेल्वे स्टेशनचं माझे घर झाले असल्याचे कमलबाई यांनी सांगितले.
इन्फो :
संगतीने मुलाला बिघडवल्याचे दुःख
यावेळी कमलबाई यांनी पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यामुळे मुलानेच घराचा गाढा ओढला. मुलगा कष्टाळू आणि हुशार होता. मात्र,मित्रांच्या संगतीत राहून त्याला दारूचे व्यसन जडले आणि त्याच्या जीवनाची दशा सुरू झाली. दारूमुळे त्याने नोकरी सोडल्याने कुटुंबातील सर्वांचे हाल होत आहेत. आपल्या कष्टाळू मुलाला मित्रांच्या संगतीने बिघडवल्याचे खूप दुःख झाले असल्याची भावना कमलाबाई यांनी''लोकमत'' कडे व्यक्त केली.