किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : गुजरातमधील सुरतपासून तब्बल एक हजार २०० कि.मी.अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशच्या सीमेवरील अमिलाह हे गाव आहे. कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमध्ये भाकरीचा चंद्र शोधण्याच्या आशा मावळल्याने नव्हे तर उपासमारीची वेळ आल्याने पतीच्या खांद्याला खांदा लावत अवघ्या महिनाभरापूर्वी सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या महिलेने आपल्या सुखी संसाराचा गाशा गुंडाळून व भर उन्हात अवघ्या महिनाभराच्या नवजात शिवानीला डोईवर घेऊन सायकलवर मजल दरमजल निघालेल्या सोनूसिंग या महिलेची जणूकाही कोरोनामुळे ममत्वाची माया आटल्याचे विषण्ण करणारे चित्र मातृदिनाला दृष्टिक्षेपात आल्याची शोकांतिका आहे.मध्य प्रदेशातील उत्तर प्रदेशच्या सीमेवर सिधी जिल्ह्यातील अमिलाह रामपूर या गावात एक एकर शेती व छोट्याशा घरात चार भावांच्या संसाराचा रहाटगाडा हाकता जात नव्हता. म्हणून राजबोहरनसिंह बालकरणसिंह (२८) हा पत्नी सोनूसिंह यांच्या संसारवेलीवर दोन वर्षाचा मुलगा शुभम रूपी फुल बहरलं तर एक अपत्य पत्नी सोनुच्या उदरात उद्याच्या स्वप्नांचा वेध घेत होते.एकरभर डोंगराळ शेती त्यात खरीपाचं धान्य पिकत नाही. जेमतेम रब्बीतील गव्हाचा हंगाम घ्यायचा. म्हणून स्टोन क्रशिंगवर घामाच्या धारांमधून दगडं फोडूनही बहरणाऱ्या संसारवेलीला सुखी संसाराचे वेध लागले. म्हणून गत दीड दोन महिन्यांपूर्वी राजबोहरनसिंह हा आपला बायका मुलांचा संसार घेऊन गुजरातमधील सुरत या उद्योगनगरीत गेला. त्या ठिकाणी डाईंग पेंटींगचे १२ हजार रू.महिन्याचे रोजंदारीचे काम मिळाले. महिना आटोपला न आटोपला तोच कोरोनाचा बिगूल वाजला.लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद पडल्या. भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी गेले असता तो चंद्रच मावळला. त्या कोरोनाच्या महामारीतच पत्नी सोनू हिला प्रसव वेदना होऊ लागल्याने तिला एका खासगी प्रसूतिगृहात दाखल केले. संबंधित डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे तिची प्रसूती करून शिवानी बालिका जन्माला आली. घरून स्टोन क्रशिंगवर कमावलेली जमापुंजी व महिन्याचे १२ हजार रू. प्रसूतीसह महिनाभराच्या घरखर्चात संपल्यावर उपासमारीची वेळ यायला लागली. घरमालक घरभाडे महिन्याच्या आगावू मागत होता. नाहीतर घराबाहेर निघा म्हणून घरचा रस्ता दाखवत होतोप्रसूती झालेली पत्नी, नवजात महिन्याचे बाळ अन् दोन वर्षांचा शुभम अशा परिवाराची खाण्या-पिण्यासाठी काही नसल्याने उपासमार होवू नये म्हणून, या छोट्या कुटुंबाने आपला सुखी संसाराचा गाशा गुंडाळून सुरतहून सायकलवर डबलसिट आपल्या नवजात व छोट्या चिमुरड्यासह तब्बल १ हजार २०० कि.मी. अंतरावरील आपल्या गावी परत जाण्याची खूणगाठ मारली.प्रसूती म्हणजे पुनर्जन्म. त्यात सिझेरियनद्वारे प्रसूती म्हणजे मरणयातना. अशा महिनाभराची प्रसुती झालेल्या गृहिणींना आपापल्या माहेरात किमान सव्वा महिना ते दोन महिने घराचा उंबरठा ओलांडू न देण्याची काळजी मायबाप घेतात. मात्र हातावर पोट असलेल्या राजबोहरनसिंहवर कोरोनाच्या आपत्तीत महिनाभराच्या सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या पत्नी सोनुला एक महिन्याच्या नवजात शिवानीला काखेत घेऊन सायकलच्या कॅरीवर व मुलगा शुभम याला सायकलच्या पुढील दांडीवर बसवून संसाराचा गाशा सायकलवर गुंडाळून ४२ ते ४४ सेल्सिअंश उष्ण तापमानात सुरत सोडण्याचा कटू प्रसंग गुदरला.सायकलीवर कोवळ्या प्रसूती झालेल्या पत्नी सोनूसह तिच्या काखेत नवजात बाळ शिवानी व लहान मुलगा शुभमसह सारा संसार सायकलवर घेऊन निघालेल्या राजबोहरनसिंह महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहचला असता, सायकलसह त्याला एका दयाळू ट्रकचालकाने ट्रकमध्ये घेतले. त्याने धुळ्यात सोडल्यानंतर पुन्हा काही अंतर त्याने सायकलीवर कापले. तान्हुल्याला पाहून करूणा वाटणाºया वाहनचालकाने पुन्हा त्यांना भुसावळजवळ सोडले. त्यापुढे सायकलने थोडे अंतर कापल्यानंतर एका ट्रकचालकाने त्यांना सावद्यापर्यंत सोडले. सावदा शहरातून हाजी अख्तरअली हुसेन पेट्रोल पंपचालकाने या परिवाराला खादगी वाहनाने रावेर शासकीय विश्रामगृहावर सोडण्याची व्यवस्था केली.पाचवा दिवस उजाडलेल्या या दाम्पत्यातील महिनाभराची सिझेरियनद्वारे प्रसूती झालेली महिनाभर उन्हात आपल्या इवलाशा महिनाभराच्या ४३ सेल्सिअंश तापमानात लहाकणाºया शिवानीला पाहून मानवसेवेचा यज्ञमंडप उभारलेल्या रावेर पोलीस ठाण्यातील खाकीतला दर्दी पोलीस कॉन्स्टेबल नीलेश लोहार, विजय महाजन व हेमंत बडगुजर, विशाल अग्रवाल यांनी त्यांना भोजन, लहान बाळांना दूध, बिस्किटे, ब्रेड, ग्लूकॉन डी देवून रविवारी पहाटे खासगी वाहनाने म.प्र.सीमेपर्यंत सोडून दिले.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये महिन्यापूर्वी सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या मातेची भर उन्हातही माया आटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:02 PM
कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमध्ये भाकरीचा चंद्र शोधण्याच्या आशा मावळल्याने नव्हे तर उपासमारीची वेळ आल्याने पतीच्या खांद्याला खांदा लावत अवघ्या महिनाभरापूर्वी सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या महिलेने आपल्या सुखी संसाराचा गाशा गुंडाळून व भर उन्हात अवघ्या महिनाभराच्या नवजात शिवानीला डोईवर घेऊन सायकलवर मजल दरमजल निघालेल्या सोनूसिंग या महिलेची जणूकाही कोरोनामुळे ममत्वाची माया आटल्याचे विषण्ण करणारे चित्र मातृदिनाला दृष्टिक्षेपात आल्याची शोकांतिका आहे.
ठळक मुद्देसुरतहून उत्तर प्रदेशच्या सीमेवरील अमेलिया (मध्य प्रदेश) या १२०० कि.मी. अंतरावरील गावाला जाण्यासाठी महिन्याच्या तान्हुल्याला सायकलवर घेऊन निघालेय दाम्पत्यविषन्न करणारे चित्र दिसले मातृ दिनीरस्त्यात भेटताय मदतगार