चंद्रमणी इंगळे हरताळा, ता. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील महिलांना केवळ शेतमजुरीवर अवलंबून राहून परिवाराचा गाडा ओढत खूपच समस्यांना तोंड द्यावे लागते. हे काम करीत असताना काही माता मुलांच्या भविष्यासाठीही रक्ताचे पाणी करताना दिसतात. अशाच येथील एका महिलेने अगदी शेतमजुरी व काबाडकष्ट करून कठीण परिस्थितीमधून मार्ग काढत दोघा मुलांना पोटतिडकीने शिकवले. त्यातील एक मोठा मुलगा आदर्श शिक्षक आहे. आणि दुसरा मुलगा जळगावला चार्टर्ड अकाउंटंट आहे.ही प्रेरणादायी गाथा आहे, केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व अपार कष्ट करीत मुलांना शिक्षण देणाऱ्या प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांची. बैलगाडी हाकण्यासाह शेतीची सर्व कामे करीत. त्या पिठाची गिरणीही चालवत आहेत. केवळ दिड - दोन एकर कोरडवाहू शेती मेहनतीने बागायती केली आहे. मोठ्या कुटुंबात राहत सर्व संसाराचा गाडा ओढताना त्यांचा सिंहाचा वाटा आहे.या कामांमध्ये त्यांना पतीचीही मोलाची साथ मिळत असल्याचे त्या सांगतात. असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मात्र, प्रभाकर किसन पाटील यांच्या बाबतीत हे थोडे उलट आहे. आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. महिलांना मदत नको कामे द्यायला पाहिजे अनेकदा समाजातील महिला पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर दुःख उगाळत बसण्याऐवजी आम्हाला मदत नको तर आम्हाला कामे द्या.अठराविश्वे दारिद्र्य व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या येथील प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी मातृ दिनानिमित्त आपले विचार मांडले. आजही शिकलेल्या तसेच कष्टकरी बाईला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागत असल्याची त्यांची खंत आहे. महिलेचे विश्व हे पती आणि मुले इतकेच मर्यादित असते. यासाठी ती धडपडताना दिसते. विशेषत: ग्रामीण भागात पतीच्या खांद्याला खांदा लावून टिचभर पोटासाठी अनेक महिला या परिश्रम घेताना दिसतात.
मुलांना दिले संस्कार सध्याच्या सोशल मीडियावरील व दूरसंचार संचावरील मालिकांमुळेही दुष्परिणाम होत आहेत. याला कारण केवळ समाज आणि कायदे नसून घरातील संस्कारही जबाबदार आहेत. मुलांच्या तुलनेत मुलीला घरातच दुय्यम स्थान वागणूक मिळते. मुलगा लाडात वाढल्याने आई-वडिलांचे ऐकण्याच्या पलीकडे गेलेला दिसतो. यासाठी मुलगा असो की, मुलगी... आई-वडिलांनी बालपणापासूनच चांगले संस्कार आपल्या मुलांवर करणे काळाची गरज आहे. आणि याकडे प्रमिलाबाईंनी विशेष लक्ष दिले.
‘सासू आणि तिच्या डोळ्यात आसू’ सून न टाकी तिचे गुण, पूर्वीपेक्षा वाढ दिसत आहे. पूर्वीच्या जुन्या म्हणी आजही कौटुंबिक स्थितीमध्ये सर्वांना घेऊन चालणारी परिस्थिती संस्कार करणे गरजेचे आहे. सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढलेला आहे. यावर संयमाने मार्ग काढणे सध्याची गरज आहे. -प्रमिलाबाई प्रभाकर पाटील