संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव : पानविडा, विड्याचे पान व एकूणच पानठेला चालविणे याआधी पुरुषप्रधान संस्कृतीत महिलासांठी हे क्षेत्र निषिद्ध मानले गेले. अशा स्थितीत शिंदीतील बेबाबाई मगन सोनार (बाविस्कर) यांनी मात्र पतीनिधनानंतर त्यांचेच उपजीविकेचे साधन असलेली पानटपरी त्यांच्या मागे ३५ वर्षापासून चालवत, रंगणा-या पानविड्यासम आपल्या आयुष्यांचे पान सजविले आहे. पानमंदिरातून मुलाबाळांचे घर एक मंदिर केले आहे.
स्टॅण्डवर टाकली पानटपरीमूळचे तापीकाठच्या बामगावचे हे कुंटुंब शिंदी, ता.भडगाव या बेबाबाईच्या माहेरीच वास्तव्यास आले. सोनार म्हटले म्हणजे सोनारकी आली परंतु परिस्थिती मोलमजुरीची. यामुळे हा व्यवसाय दूरच, चाचभर शेती नाही. शिंदीतील प्रसिध्द तमाशा कलावंत धोंडू-कोंडू यांच्या लोकनाट्य मंडळात जुन्या टमटम नामक मोटारगाडीचे मगन सोनार हे चालक झाले. गाडीचे हँण्डल मारुन मारुन त्यांना दमा जडला म्हणून शिंदी स्टँण्डवर उत्पन्नाचे साधन म्हणून पानटपरी टाकली. पुढे त्यांचे निधन झाले. जबाबदारी बेबाबाई यांच्यावर आली. लहान-लहान दोन मुले, दोन मुली. गावात भाऊ-भावजयी होतेच. शिवाय माहेरच्या माणसांनी भावाप्रमाणे साथ, हिंमत दिली. पानटपरीचा व्यवसायच पुढे चालविण्याचे ठरले. सकाळी शेतावर मजुरी जाण्याआधी व संध्याकाळी शेतमजुरीवरुन आल्या म्हणजे बेबाबाई पानटपरी चालवत. पाच पैसे पानविडा होता. एका दिवशी दोनशे पान खपत. पानाच्या मोबदल्यात गावातून ज्वारी, गहू आदी गव्हाई मिळे. बेबाबाई शेतमजुरीला जात तेव्हा दोन्ही मुली, मुले पानटपरी चालवत. यावरच घरसंसार, दोन मुलींचे विवाह केले. लोटन व योगेश या दोन मुलांचे शिक्षण केले. मुलांना कुठे कमी पडू दिले नाही. अगदी १०० रुपयाची घरातील ज्वारी विकली पण लहान्याला सहलीला पाठविले, अशी कहाणी आहे. आज मोठा ऑर्डनन्स फॅक्टरीत, तर लहान योगेश खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गावी चांगले घर बांधले आहे. कुटुंब चांगले स्थिरस्थावर झाले आहे. मुलांना काडीमात्र व्यसन नाही. आईच्या कष्टाची जाणीव ठेवत तिला जपतात. याहून घरापेक्षा मंदिर दुसरे कोणते असू शकते?
बेबाबाईला माहेरची ओढ मुले आईला आपल्याकडे बोलावतात पण बेबाबाईला माहेरची ओढ स्वस्थ बसू देत नाही. लॉकडाऊनमुळे बंद असली तरी आजही त्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत पानटपरी चालवतात. न घाबरता रात्री उशिरापर्यंत थांबून असता. पानविडा सध्या काहीसा मागे पडलाय म्हणून त्या जोडीने गोळ्या, बिस्कीट व कुरकुरे विकतात. गावातील कै.अभिमन पाटील, कोंडुरामजी, शिवराम दादा, हिराबाई पाटील यांनी त्यावेळेस चांगली साथ दिली, अशी माहेरच्या माणसांच्या मनाच्या श्रीमंतीचा त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.
लेकरांसाठी घेतलेल्या कष्टाला तोड नाहीमुलांच्या शिक्षणासाठी बेबाबाईने मोठ्या खस्ता खाल्ल्या. गावातील पिठाच्या गिरणीत खाली पडलेल्या पिठावर, ज्वारी-बाजरीचा घाटा, फागच्या पानांची भाजी, लाल अडगर ज्वारी यावर दिवस काढले. जात्यावर कुणाचे घरचे दळण कर, कांडण, धान्य सोय-साय कर, कुणाच्या शेतात गहू आदी शेतमालाचा सरा (शेतमाल काढून मागे शिल्लक राहिलेले) कर असा घरसंसार चालवला. एकूणच कहाणी ऐकून डोळ्यातून धारा लागतील, असे मुलांच्या भल्यासाठी तिने कष्ट उपसले.