जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र आठवड्यापुर्वीच रोटरी भवनात हलविण्यात आले होते. हे केंद्र पुन्हा जीएमसीच्या दिव्यांग बोर्डात हलविण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिले आहे. मात्र, हे केंद्र जीएमसीत सुरू करणार कसे, असा प्रश्न स्थानिक यंत्रणेपुढे असून यात मोठ्या अडचणींचा डोंगर असल्याचे चित्र आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर हे केंद्र असल्याने ज्येष्ठांना अडचणी होत होत्या. त्यामुळे रोटरी भवनात हे केंद्र हलविण्यात येत होते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड कक्ष हा दिव्यांग बोर्डाच्या शेजारीच असून या ठिकाणी आता अनेक डॉक्टर, कर्मचारी बाधित आढळून आल्यामुळे मनुष्यबळाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासह कोरोना कक्ष शेजारीच असल्याने या ठिकाणी गर्दी झाल्यास धोका उद्भवू शकतो, ज्येष्ठांना पुन्हा अडचणी आल्यास पुन्हा केंद्र बदलविण्यात येईल का ? अशा असंख्य प्रश्नांवर सध्या रुग्णालय प्रशासनात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे हे केंद्र या ठिकाणी सुरू करावे की नाही, यावर सद्यतरी प्रश्निचिन्ह आहे.