ऑनलाईन लोकमत
कळमसरे, ता.अमळनेर, दि.27- कळमसरे शाळेतील शिक्षक सुरेश पावरा यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्याथ्र्यानी मंगळवारी सकाळपासून आंदोलन सुरु केले. शिक्षणाधिकारी व पोलिसांच्या आश्वासनानंतर तीन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, काही पालकांनी आपल्या मुलांचा दाखला काढून घेत रोष व्यक्त केला.
कळमसरे येथील शिक्षक सुरेश पावरा यांची समायोजन अंतर्गत संस्थेच्या किनोद येथील शाळेत बदली झाली आहे. 16 डिसेंबर 2016 पासून ते बदलीच्या ठिकाणी कार्यरत आहेत. पावरा यांना कळमसरे येथे पुन्हा नियुक्ती द्यावी या मागणीसाठी मंगळवारी विद्याथ्र्यानी आंदोलन सुरु केले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य मंडप उभारला होता. मंडपात विद्यार्थी, पालक घोषणाबाजी करीत होते. आंदोलनादरम्यान 6 ते 7 विद्याथ्र्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळी 10 वाजता मारवड पोलीस स्टेशनचे साहाय्यक निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक, संचालक मंडळाला बोलवित शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. शिक्षणाधिका:यांनी शैक्षणिक वर्षाच्या कर्मचारी संच मान्यतेशिवाय शिक्षकांची बदली करणे शक्य नाही. त्यामुळे सद्यस्थितीला ज्या शिक्षकांची बदली झाली आहे. त्या ठिकाणच्या नियुक्तीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. संचमान्यतेत पदसंख्येत वाढ झाल्यास पावरा यांना त्याच शाळेत परत नियुक्ती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. काही पालकांनी विद्याथ्र्याचे दाखले काढून घेत रोष व्यक्त केला.