जळगाव /चाळीसगाव/मुक्ताईनगर - मराठा आरक्षणाच्या मागणीसह मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाला जलसमाधी घ्यावी लागल्याच्या निषेर्धात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चाळीसगाव येथे प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुकाने सकाळपासून बंद होती. तसेच मु्क्ताईनगर येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पाचोरा व भडगाव येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली.चाळीसगाव येथे सकाळी ११ वाजता स्टेशनरोडवर मराठा मोर्चाच्या पदाधिका-यांनी पदयात्रा काढून नागरिक आणि दुकानदारांना बंदचे आवाहन केले. स्टेशन रोड, सिग्नल चौक, गणेश व्यापारी संकुल, राधास्वामी व्यापारी संकुल, गायत्री व अष्टभुजा व्यापारी संकुलातही कडकडीत बंद पाळण्यात आला. घाट रोड, पोलीस स्टेशन परिसरात पायी फिरुन आंदोलक कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी ‘आरक्षण नाही कुणाच्या बापाचं...ते तर आमच्या हक्काचं’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.शाळा, महाविद्यालये यांना बंद मधून वगळ्यात आले असले तरी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प होती.बंदच्या आंदोलनात संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे गणेश पवार, योगेश राजधर पाटील, खुशाल पाटील, अरुण पाटील, भूषण पाटील, भैय्यासाहेब पाटील, सुनील पाटील आदींसह एक हजाराहून अधिक कार्यकर्ते बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
मराठा आरक्षणसाठी चाळीसगावला बंद, मुक्ताईनगर येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:35 PM
पाचोरा, भडगाव येथे श्रद्धांजली सभा
ठळक मुद्देचाळीसगावला आंदोलकांनी पदयात्रा काढून केले आवाहनघोषणांनी परिसर दणाणला