लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर आता संघटनात्मक बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दौरा आटोपताच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी प्रमुख ६० ते ६५ पदाधिकाऱ्यांकडून एकत्रित आढावा घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर आता लवकरच सर्व पक्षश्रेष्ठींची बैठक होऊन याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नुकताच जळगाव जिल्हा दौरा झाला. एका दिवसात त्यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना पटोले यांनी बोलणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले, शिवाय सर्वांनाच भेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह आल्याचे सांगितले जात आहे.
अशी सुरू केली प्रक्रिया
जिल्हाभरातील माजी आमदार, खासदार, प्रदेश प्रतिनिधी, ब्लॉक अध्यक्ष, अशा साधारण ६० पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून एक संदेश गेला. त्यानंतर त्यांना कॉल जाऊन प्रत्येकाकडून संघटात्मक वाढीसंदर्भात प्रतिक्रिया ऐकून घेत, तीन नावे विचारण्यात आली. हे सर्व गुप्त ठेवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
लवकरच चर्चा आणि बदल
मागविण्यात आलेल्या नावावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, आ. शिरीष चौधरी आदींसह पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, यात काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील, विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, भगतसिंग पाटील, विजय महाजन यांची नावे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत समोर येत आहेत.