जळगाव : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी मंडळाने निर्माण केलेले संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
मंडळाचे संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. दहावीच्या परीक्षेच्या निकालावेळी सर्व्हर क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल समजायला चार ते आठ तास विलंब झाला. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी मंडळाचा गलथानपणाच यास कारणीभूत असल्याचे आमदार भोळे यांचे म्हणणे आहे. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. संकेतस्थळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे तसेच नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.