ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 - वारंवार मागणी करूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर रस्त्यांचे काम होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी संध्याकाळी समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात तिरडी ठेवून व डफडे वाजवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. महामार्गावर अजून किती बळी जाणार? असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
महामार्गानजीक नशिराबाद नाका ते बांभोरी गिरणा पूल या 10 किलोमीटर अंतरात समांतर रस्ते विकसित नसल्यामुळे सर्वच वाहनांना महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढून निष्पापांचे बळी जाणे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा शिवकॉलनी रेल्वे पुलावर ऐनपूर महाविद्यालयातील ग्रंथपालास भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा घटना सुरूच आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून समांतर रस्ते विकसित करण्याच्या मागणीसाठी जळगावात सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकत्र येवून समांतर रस्ते कृती समिती स्थापन केली आहे.
कृती समितीने यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासन व शासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी सायंकाळी शहरातील अग्रवाल हॉस्पिटल चौकात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनस्थळी बसलेल्या कार्यकत्र्यांनी शासनाचा व प्रशासनाचा निषेध म्हणून हातात समांतर रस्त्याच्या मागणीचे फलक धरले होते. कृती समितीच्या या आंदोलनात नगरसेवक अनंत जोशी, कैलास सोनवणे, अमर जैन, गजानन मालपुरे, विनोद देशमुख, फारुख शेख, विराज कावडीया, अमित जगताप, पियूश पाटील, मितेश भदाणे, अमोल कोल्हे, नवल गोपाल, शंतनू नारखेडे, रवींद्र नेरपगारे, समीर शेख, विनोद सैनी, कल्पेश पाटील, भूषण सोनवणे, विवेक पाटील, श्वेता कोळी, वैशाली पाटील, प्रवीण ठाकरे, प्रमोद वाणी, जे.पी. वानखेड आदी उपस्थित होते.