लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील भादली ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथीयाने वॉर्ड क्रमांक चारमधून अर्ज भरला होता; मात्र हा वॉर्ड महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अंजली पाटील ऊर्फ जान अंजली गुरू संजना (वय ४०) या तृतीयपंथीयाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी तहसीलदारांच्या कार्यालयासमोर काही वेळ धरणे आंदोलनदेखील केले. अंजली या तृतीयपंथीयाने २०१५ च्या ग्राम पंचायत निवडणूकदेखील लढवली होती. त्यावेळी आपण ११ मतांनी पराभूत झाल्याचा दावा अंजलीने केला आहे; मात्र यंदा हा अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
भादलीतील वॉर्ड क्रमांक चार महिला सर्वसाधारण प्रवर्गात राखीव आहे. त्यामुळे या वॉर्डातून मतदार यादीत ‘इतर’ असा उल्लेख केलेले निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे हा अर्ज बाद केल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी लुल्हे यांच्याकडून देण्यात आले होते; मात्र त्यावर अंजली आणि शमिभा पाटील यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर तेथे बराच वेळ वाद सुरू होता. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चादेखील केली; मात्र सायंकाळी त्यातूनदेखील तोडगा निघाला नव्हता.