ऑनलाईन लोकमत विशेष
सावदा,जि.जळगाव,दि.22- उत्कृष्ट कामकाज, नियोजन यामुळे आधीच आयएसओ 9001-2015 मानांकन प्राप्त झालेल्या सावदा पोलीस ठाण्याची स्मार्ट पोलीस ठाण्यासाठी निवड झाली असून आता भविष्यात स्मार्ट पोलीस ठाणे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.
जानेवारी महिन्यात आयएसओ नामांकन
सावदा पोलीस स्टेशनला जानेवारी 2017 मध्ये आयएसओ मानांकन मिळाले होते. त्यासाठी तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी प्रयत्न केले होते. जनसंपर्क वाढवणे, गुन्ह्यांचे प्रभाव नियंत्रणात आणणे, पोलीस स्टेशन पसिर स्वच्छ ठेवणे, गोपनिय, क्राईम रेकॉर्ड व्यवस्थित व अपडेट ठेवणे, जातीय सलोखा वाढविणे यासह विविध निकषावर प्रमाणित झाल्याने सावदा पोलीस स्टेशनला आयएसओ नामांकन मिळाले होते.
पाच स्मार्ट पोलीस स्टेशनसाठी सावद्याची निवड
जिल्ह्यातील पाच पोलीस ठाणे स्मार्ट करण्याची घोषणा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी केल्याने व त्यात सावदा पोलीस स्टेशनच्या समावेश असल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे.
अवैध प्रवासी वाहतूक व गुटखा बंदीला प्राधान्य
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात वाढलेली अवैध प्रवाशी वाहतूक, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणले आहे. गुटखा बंदीच्या विषयाला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिले आहे. स्मार्ट पोलीस ठाण्यांसाठीचे निकष काय असतील याबाबत अद्याप माहिती नसली तरी नशिराबाद पोलीस स्टेशनचा अनुभव असल्याने त्या दृष्टीने कामकाजाला सुरूवात झाली आहे.