जळगाव : लेकीने वडिलांचा मान ठेवून, वडिलांनी केलेल्या कामांची जाण ठेवून बापाच्या आज्ञेत राहावे असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांना उपरोधिक सल्ला दिला आहे. रविवारी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ या उपक्रमाच्या ठिकाणी सोलर पॅनलसह उपयुक्त सामग्रीचे लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
केळी पीक विम्याच्या बदलेल्या निकषांवरून गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केळी पीक विम्याच्या श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती. खासदार खडसे यांनी गुलाबराव पाटील हे वडिलांसारखे असल्याचे सांगत काम केल्यामुळे त्यांनी लेक समजून प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर बोलताना रविवारी गुलाबराव पाटील यांनी खासदार खडसे या माझ्या लेकीसारख्या असल्याने त्यांनीदेखील वडिलांची जाण ठेवून, आज्ञेत राहावे असे सांगितले.