लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लेकीने वडिलांचा मान ठेवून, वडिलांनी केलेले कामांची जाण ठेवून लेकीने बापाच्या आज्ञेत रहावे असे म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांना उपरोधिक सल्ला दिला आहे. रविवारी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ या उपक्रमाच्या ठिकाणी सोलर पॅनलसह उपयुक्त सामग्रीचे लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून केळी पीक विम्याचा बदलेल्या निकषांवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन दिवसांपुर्वी केळी पीक विम्याचा श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती. खासदार खडसे यांनी गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असल्याचे सांगत चांगले काम केल्यामुळे त्यांनी लेक समजून प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर बोलताना रविवारी गुलाबराव पाटील यांनी खासदार खडसे या माझ्या लेकी सारख्या असल्याने त्यांनीदेखील वडिलांची जाण ठेवून, आज्ञेत रहावे असे सांगितले.