लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. कार्यकर्त्याना कार्यकर्ता म्हणून नव्हेत तर मित्र म्हणून जवळ करणारे एक तरूण प्रतिभाशाली नेतृत्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. यासह खासदार सातव यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आहे.
जळगावच्या आठवणी
खासदार राजीव सातव हे २०१५ साली जळगावात आले होते. त्यांनी काँग्रेस भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. शिवाय नुकतीच जानेवारी महिन्यात आम्ही त्यांची मुंबईत भेट घेतली हाेती, तेव्हा जिल्ह्यात जाेमाने कामाला लागा, असे त्यांनी सांगितले होते, असे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले. यासह त्यांनी जामनेर व पाचोरा येथेही मेळावे घेतले होते.
राजीव सातव हे अत्यंत प्रतिभाशाली नेतृत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी पक्षाची मोठी सेवा केली. लोकांशी, जमिनीशी नाळ जोडलेला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. उज्ज्वल भविष्य असलेला नेता आपल्यातून गेला आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. भविष्यातील नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो. - ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व हरपले आहे. कमी वयात सामाजिक आणि विकासात्मक कामांची त्यांना जाण होती. यातूनच त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला. राहुल गांधींना त्यांनी महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यक्रमात साथ दिली. त्यांचे प्रत्येक राज्यात फाॅलोअर्स आहेत. गुजरात निवडणुकीत त्यांनी निवडणूक कौशल्य पणाला लावून अगदी विजयाच्या जवळ पक्षाला नेले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. - डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस
खासदार राजीव सातव हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माझ्याकडे युवकचे जिल्हाध्यक्षपद होते. त्यावेळी त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या. त्यांचा पाचोरा, जामनेर येथे मेळावा झाला होता. त्यांनी जळगावात भेट दिली होती. अगदी मित्र व भाऊ-भाऊ म्हणून ते कार्यकर्त्यांना वागणूक देत असत. त्यांच्या जाण्याने युथ काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी भरून निघणार नाही. - अविनाश भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष