जळगाव : रावेर येथे झालेल्या दंगल प्रकरणात मकबूल शेख, कालू शेख,आदिल खान व मधु पैलवान यांच्यावर झालेली एमपीडीएची कारवाई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्दबातल ठरविली आहे. ४ जानेवारी रोजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व एम.जी शेवलीकर यांनी स्थानबद्द आदेश रद्दबातल केले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालु शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान, मधुकर उर्फ मधु पैलवान व १ अतिरिक्त अशा पाच व्यक्तींविरुद्ध एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश १९ सप्टेंबर २० रोजी पारित करून उपरोक्त चारही ही संशयितांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या आदेशाच्या विरोधात चारही जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ४ जानेवारी २० रोजी न्यायमूर्ती टी व्ही नलवाडे व न्यायमूर्ती एम जी शेवलीकर यांच्या पीठासमोर प्रकरण आले असता त्यांचे वकील जयदीप चटर्जी यांनी स्थानबद्ध कसे बेकायदेशीर व अन्याय करणारे आहे हे न्यायालयाला पटवून दिले.