लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. परिणामी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोर्ट चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची...,राज्य सरकारचे करायचे काय, खालती डोके वरती पाय़..., एमपीएससी परीक्षा झालीच पाहीजे...अशा जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर या घोषणांनी दणाणून गेले होते.
रस्त्यावर अचानक सुरू झाले रास्तारोको
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, याची माहिती झाल्यानंतर जळगाव शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी कोर्ट चौकात एकत्र आले. त्यांनी थेट रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. चौकाचे चारही मार्ग विद्यार्थ्यांनी रोखून धरले होते. अचानक सुरू झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात, पण एमपीएससी परीक्षा होत नाही...
कोर्ट चौकात रास्तारोको सुरू झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांकडून राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे निवडणुका होतात. मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमतात. त्यावेळी कोरोना फैलावत नाही. फक्त परीक्षा घेतली की कोरोनाचा उद्रेक वाढेल का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जात होता. दोन ते तीन वर्षांपासून अभ्यास करीत आहोत, पण राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे, रोजगार मिळत नाही, त्यामुळे आता आत्महत्या करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आल्याची भावना काहींनी बोलून दाखविली.
चौथ्यांदा पुढे ढकलली परीक्षा
एमपीएससी परीक्षा राज्य शासनाने चार वेळा पुढे ढकलली आहे. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? वय वाढत आहे, त्यात परीक्षेची संधी हातून जात आहे. याचा राज्य शासनाने विचार करायला हवा, अशाही भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
दीड तास चालले आंदोलन : पोलिसांची एंट्री
साडेतीन वाजेपासून संतप्त विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकातील आंदोलन करत रस्ता रोखून धरला होता़ सुमारे साडेचार वाजेपर्यंत हा रास्तारोको सुरू होता़ दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती झाल्यानंतर शहर, जिल्हापेठ तसेच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत घातली़ मात्र, राज्य शासन परीक्षेचे पत्र काढीत नाही़ तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. अखेर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे हे फौजफाटा घेऊन कोर्ट चौकात दाखल झाले. त्यांनी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांची पुन्हा समजूत घालून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा मागे घेत रस्ता मोकळा केला. आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन
पोलिसांनी संतप्त विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले़ नंतर परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याठिकाणीही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून त्यांच्या भावना मांडल्या व निवेदन दिले.