(विद्यार्थ्यांचे फोटो - पूर्वा जाधव - ०७ सीटीआर ४२., चेतन पाटील -०७ सीटीआर ४३)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती तसेच घेण्यात येणा-या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नसल्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तारखा जाहीर करण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुले एमपीएससीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वगार्तील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच मागील दीड ते दोन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी वारंवार परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.
एमपीएससीमार्फत घेण्यात येणा-या आरटीओची पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष झाले, तरीही निकाल लागलेला नाही. सहा. वन संरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग-क च्या मंत्रालयीन पदांकरिता दोन वर्षांपासून जाहिरात नाही. तसेच कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठीची प्रक्रिया अपूर्ण आहे. त्याचबरोबर मागील वर्षाच्या मुखाखती प्रलंबित आहेत.
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
- गत दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम आहे.
- एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा त्वरित जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
-कोरोनाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने सध्या क्लास हे आॅनलाईन पद्धतीने सुरू आहेत.
-आॅनलाईन क्लास घेताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच मोबाईलवरच क्लास होत असल्याने डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती आहे.
-कोचिंग क्लासला परवानगी मिळाल्यास विद्यार्थ्यांसह क्लास चालकालाही दिलासा मिळणार आहे; मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने आॅनलाईन क्लास किती दिवस चालणार, याबाबत संभ्रम आहे.
क्लास चालकही अडचणीत !
विद्यार्थी एकट्यात अभ्यास करीत आहेत तर परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सुध्दा सुध्दा संयम पाळून अभ्यास करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षांपासून क्लास बंद असल्याने क्लास चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. क्लास चालक कोरोना नियमांचे पालन करतीलच. अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू होत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची परवानगी देऊन क्लास चालकांना दिलासा द्यावा. तसेच पंधरा हजार जागा भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.
-गोपाल दर्जी, क्लास चालक
००००००००००००००
मुळात स्पर्धा परीक्षांच्या मुलांवर पारवारिक आणि सामाजिक अपेक्षांचे ओझे मोठ्या प्रमाणात असते. हे ओझे घेवून विद्यार्थी अभ्यास करतात. त्यात जर परीक्षा झाल्या नाही तर त्यांच्या हाती मोठे नैराश्य येते. युपीएससी तारखा बदलू देत नाही. त्याप्रमाणे एमपीएससीने काम करावे, पण राजकीय दबावामुळे एमपीएससीला योग्य प्रकारे काम करता येत नाही. आता दुकान चालविण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, तीस विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसण्याची परवानगी दिली जात नाही ही शोकांतीका आहे. त्यामुळे तात्काळ केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.
- जयेंद्र लेकुरवाळे, क्लास चालक
०००००००००००००००
काय म्हणतात विद्यार्थी
नुसती नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करित नाही तर प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत असतो. वाढते वय, कुटूंबाच्या अपेक्षा तसेच कित्येक वर्षाची मेहनत या सर्वांना समोरे जात असताना भरतीमधील अनियमितता व चुकीचे व्यवस्थापन यामुळे नैराश्य येतेच़ म्हणून शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेवून तरूण पिढीचे मनोबल जपले पाहीजे.
- पूर्वा जाधव, विद्यार्थिनी
------------------------
कोरोनामुळे पुढे ढकललेल्या परीक्षांमुळे उमेदवारांच्या वयाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच भरती होत नाही. अशा परिस्थितीत परीक्षार्थी आर्थिक संकटांचा सामना करून परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होतील याची प्रतीक्षा करित आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावे आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
- चेतन पाटील, विद्यार्थी