जळगाव :महावितरणतर्फे विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती संदर्भात अद्याप निर्णय घेण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महावितरण प्रशासना विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी महावितरणमधील विविध विभागांच्या अभियंत्यांनी बुधवारीसबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या माध्यमातून प्रशासनाविरोधात निदर्शने करुन, दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.महावितरणच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयासमोर दुपारी विविध विभागाच्या ५० हून अधिक अभियंत्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. तर प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाजही केले. यावेळी सबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सुहास चौधरी, गणेश वराडे, मुकेश पाटील, देवेंद्र भंगाळे, संदीप महाजन, मिलिंद इंगळे, मयूर भंगाळे, विशाल आंधळे, देवेंद्र सिडाम, रविंद्र पवार, रत्ना पाटील, ऋचा दहीभाते आदी अभियंते उपस्थित होते.या आहेत मागण्या संघटनांना विश्वासात न घेता राबविण्यात येणारी 'अनिवार्य रिक्त पदे' ही संकल्पना रद्द करा. अभियंत्यांच्या विनंती बदलीचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना तात्काळ पदस्थापना देणे, अभियंते व कर्मचारी यांच्या बाबत कोणतेही धोरण राबवितांना संघटनांशी चर्चा करणे, महापारेषण मधील बदली धोरणात सुधारणा करणे, डिप्लोमा अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लावणे, कोरोना संदर्भात कर्मचाऱ्यांना चोवीस तास मदतीसाठी मदत केंद्राची स्थापना करणे.
महावितरणच्या अभियंत्यांचे प्रशासनाविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 8:35 PM