जळगाव जिल्हा : मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी एक, मक्तेदाराचे तीन तर इतर ३५ नागरिक
जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात कुठे-ना कुठे विजेच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतच आहेत. यामध्ये महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ४५ व्यक्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असून, मक्तेदाराचे तीन कर्मचारी व इतर ३५ नागरिकांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला आहे. तसेच मक्तेदाराकडील बाह्यस्रोत कर्मचारीदेखील कर्तव्यावर
असताना विजेच्या धक्का लागून मृत्युमुखी पडल्याच्या महावितरणकडे नोंदी आहेत. यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला महावितरणकडून आर्थिक मदत करण्यात आली असून, मक्तेदाराच्या कर्मचाऱ्याला मक्तेदाराकडूनच मदत करण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर बाहेरील इतर नागरिकाचांही विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातात महावितरणचा कुठलाही दोष नसून, संबंधित नागरिकाने महावितरणच्या डीपीला, विद्युत तारांना, घरामध्ये उपकरणे हाताळतांना आदी विविध
कारणामुळे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी महावितरणकडे आहेत. त्यामुळे या नागरिकांना कुठलीही मदत देण्यात आली नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. जर विद्युत तार किंवा खांब अंगावर पडून, तसेच इतर कुठल्याही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अशा कर्मचाऱ्यानांच मदत देण्यात येत असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात येते.
इन्फो :
विजेच्या धक्क्याने ५५ प्राण्यांचा मृत्यू
गेल्या काही महिन्यांपासून विजेचा धक्का लागून पाळीव प्राण्यांचाही मृत्यू घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ५५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू
झाला असून, ज्या ठिकाणी विद्युत तारा पडून पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत, अशा प्राणी मालकानांच आर्थिक मदत देण्यात आली आहे.
इन्फो :
महावितरण कर्मचाऱ्यानांही शॉक
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विजेचे काम करून घेण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक वीज पुरवठा सुरू होणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे महावितरणचे कर्मचारीच विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला होता.
इन्फो :
विजेच्या धक्क्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, महावितरणतर्फे त्याचा पंचनामा केला जातो. यात महावितरणचा दोष होता की संबंधित व्यक्तीनेच विजेच्या तारांना किंवा डीपीला हात लावून मृत्युमुखी पडला.तसेच इतर कारणांचा अभ्यास केला होता. तरच मदतीस पात्र आहे की नाही, हे ठरविले जाते.
फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.
इन्फो :
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली मदत
१) विजेच्या धक्का लागून जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, या कर्मचाऱ्याला महावितरणच्या नियमानुसार आर्थिक मदत कुटुंबीयांपर्यंत देण्यात आली आहे.
२) तसेच विजेच्या धक्क्याने गेल्या वर्षात मक्तेदाराचे बाह्यस्त्रोत तीन कामगार मृत्युमुखी पडले. त्यांनाही संबंधित मक्तेदारातर्फे महावितरणच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबीयांना
मदत देण्यात आली आहे.
३) तसेच जे नागरिक विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. त्यामध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार किती व्यक्ती पात्र ठरले व किती जणांना मदत देण्यात आली, याबाबत सध्या आकडेवारी उपलब्ध नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.