कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे, शासनाच्या सूचनेनुसार महावितरणतर्फे ग्राहकांना मार्च ते जूनदरम्यान सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले सरासरी वीजबिल हे अवाजवी असल्याचे सांगित, अनेक ग्राहकांनी वीजबिल भरण्यास विरोध दर्शविला. यावर महावितरणतर्फे ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी ठिकठिकाणी तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकी भरण्यात येत नसल्यामुळे, महावितरणतर्फे यंदा जानेवारी ते मार्च दरम्यान थकबाकी दारांविरोधात तीव्र कारवाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तात्पुरता व कायमस्वरूपी असा २० हजाराहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, असे असतानाही महावितरणचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसून, साडेनऊशे कोटींच्या थकबाकीची वसुली येणे बाकी आहे.
इन्फो :
सर्वाधिक थकबाकी जळगाव जिल्ह्यात
महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या जळगाव परिमंडळात सध्या स्थितीला महावितरणची घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, पथदिवे, सार्वजनिक पाणी पुरवठा व इतर विभागांची मिळून ३ लाख १५ हजार ४४४ ग्राहकांकडे साडे नऊशें कोटी ६२ लाख इतकी थकबाकी आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ३४२ ग्राहकांकडे ५०२ कोटी ७२ लाखांची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात ८२ हजार ४३६ ग्राहकांकडे ३२३ कोटी ४० लाखांची थकबाकी आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ६६६ ग्राहकांकडे १३२ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणतर्फे पुन्हा थकबाकीदारांविरोधात लवकरच कारवाई मोहीम सुरू करण्यात येणार असून, नागरिकांनी तात्काळ थकीत विज बिल भरण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.