जळगाव : शासनाने वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाई वरील स्थगिती उठविल्यानंतर महावितरणतर्फे थकबाकीदारांविरोधात वसुलीसाठी पुन्हा जोमाने कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच दोन दिवसात खान्देशातील हजारो थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार नागरिकांचे घरोघरी जाऊन रीडिंग न घेता नागरिकांना सरासरी वीज बिल देण्यात आले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले वीज बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी करीत, लाखो ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली होती. नोटिसा बजावूनही ग्राहक वीज बिल भरत नसल्यामुळे खान्देशात साडेतेरा कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे फेब्रुवारी महिन्यात जोरदार वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती. फेब्रुवारी अखेर खान्देशातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणच्या राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी महावितरण विरोधात आंदोलने झाली. याचे पडसाद मुंबईत अधिवेशनातही उमटल्याने, सरकारने या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यामुळे आठवडाभर महावितरणची मोहीम बंद होती.
मात्र, अधिवेशन संपताना सरकारने पुन्हा ही स्थगिती उठविल्यामुळे महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे जळगाव, धुळे , नंदुरबार या ठिकाणी पुन्हा जोरदार कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी कर्मचारी व अधिकारी यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
शासनाने स्थगिती उठविल्यानंतर महावितरणतर्फे पुन्हा वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण