महिंदळे, ता. भडगाव : येथील मधुकर फकिरा सोनार यांच्या राहत्या घराचे छत मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोसळले. पाऊस नसल्यामुळे व गावात वीज गेल्यामुळे कुटुंब अंगणात झोपले होते. त्यामुळे कुटुंब वाचले, अन् मोठा अनर्थ टाळला. पाऊस सुरू असता तर मोठा अनर्थ झाला असता. यात कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर आले आहे.
येथील मधुकर सोनार व अरुण सोनार या दोघा भावांचे एकत्र कुटुंब आहे. हे कुटुंब पूर्ण दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यांच्याकडे एक गुंठाही शेती नाही. तरीही या कुटुंबाला आजतागायत पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला नाही. हे कुटुंब आजही मातीच्या पडक्या घरात टेलर काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. या कुटुंबात एकूण सात सदस्य वास्तव्यास आहेत. बाकी कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी आहे. हे कुटुंब बऱ्याच वर्षांपासून याच मातीच्या घरात वास्तव्यास होते. सोमवारी पाऊस पडल्यामुळे मातीच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. पण, या कुटुंबाच्या मनात कुठलीही शंका नव्हती. मंगळवारी रात्री जेवण करून ते घरात झोपले होते. परंतु गावात वीज गेल्यामुळे पूर्ण कुटुंब अंगणात झोपायला आले व काही वेळातच पूर्ण घर कोसळले.
यात घरातील जीवनावश्यक वस्तू व पूर्ण संसार मातीत दाबला गेला. ऐन पावसाळ्यात हे अतिशय गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे. पावसात एवढे कुटुंब कसे भागवणार, या विवंचनेत कुटुंब हवालदिल झाले आहे. योग्य तो पंचनामा होऊन योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
प्रतिक्रिया
आमचे कुटुंब मोठे आहे. आम्ही चार भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित शेती नाही. आम्ही टेलरकाम करून उदरनिर्वाह करतो. हे घरही आम्ही विकत घेतले आहे. यात आमचा उदरनिर्वाह सुरळीत चालू होता. पण, अचानक निसर्गची वक्रदृष्टी आमच्या कुटुंबावर झाली व आमचा सर्व संसार मातीत गेला. पण आम्ही वाचलो हे आमचे भाग्य आहे. शासनाने आम्हालाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा.
-मधुकर फकिरा सोनार,
कुटुंबप्रमुख, महिंदळे
या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेत प्राधान्य देऊन त्यांचे घरकुल बांधून देऊ व योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. उघड्यावर आलेल्या कुटुंबाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू.
-मोहन यादवराव भदाणे,
सरपंच, महिंदळे.
===Photopath===
300621\30jal_3_30062021_12.jpg
===Caption===
महिंदळे येथील मधुकर सोनार यांचे पडलेले घर