तापी नदीला पूर : जल शुद्धीकरण केंद्र फक्त नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : गावाला तापी नदीवरून सध्या खूपच गढूळ पाणीपुरवठा होत असून, सामूहिक योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बिनकामाचे ठरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, तापीला मोठा पूर आल्यामुळे गढूळ पाण्याची समस्या उद्भवल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.
नांद्रा खुर्द येथे ममुराबाद सामूहीक पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र व पंपिग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून विशेषतः जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरणसुद्धा पूर्ण झाले आहे. त्यानंतरही ममुराबाद गावात शंभर टक्के शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात होता. आता पावसाळ्यात थेट नदीतील गाळमिश्रित पाणीच पंपिंग होऊ लागल्याने ग्रामस्थांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. अक्षरशः उकळत्या चहासारखा रंग असलेले पाणी नळांना येत असल्याने ते अजिबात पिण्यायोग्य राहिलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्राची व्यवस्था असतानासुद्धा गढूळ पाणी नळांना येतेच कसे, असा प्रश्न त्यामुळे अनेकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यातील जलजन्य आजारांची वाढती शक्यता लक्षात घेता तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
------------------
हतनूरचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे. त्यामुळे ममुराबाद गावाला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने दोन-तीन दिवस पंपिंग बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद
-
फोटो- ममुराबाद येथे तापी नदीवरून सध्या असा गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.